दारूसाठी खून करणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा

    दिनांक :17-Jul-2019
 दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून केला खून
 
 
नागपूर,
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी एका इसमाला लाकडी स्टम्प आणि दंड्याने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश काजी यांनी तीन आरोपींना जन्मठेप सुनावली आहे. विश्वास उर्फ गुड्डू दहीवले, कमलेश उर्फ कम्या कालीदास पाटील आणि सूरज राजू मानवटकर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
मृतक राकेश बापूराव रामटेके आणि आरोपी हे मित्र होते. चौघेही सोबत मिळून दारू पित असत. आरोपी हे नेहमीच राकेशला दारू पिण्यासाठी पैसे मागत असत. पैसे न दिल्यास मारण्याची आणि घरातील सामानाची नासधूस करण्याची धमकी देत असत. आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने राकेश त्यांना पैसे देत असे. ही माहिती राकेशने त्याची पत्नी वैशाली आणि साळा दीपक केशव बागडे यांना दिली होती. २८ सप्टेंबर २०१५ रोजी आरोपींनी राकेशला दारूसाठी पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून त्यांच्यात भांडण देखील झाले होते.
 
३० सप्टेंबर २०१५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास राकेश आपल्या घरी हजर असताना तीनही आरोपी त्याच्या घरी आले. आरोपींनी लाकडी स्टॅम्प आणि दंड्याने राकेशच्या डोक्यावर वार करायला सुरुवात केली. राकेश आरडाओरड करीत असताना त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि वस्तीतील लोक घटनास्थळी गोळा झाले. लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कुणीही राकेशच्या मदतीला आले नाहीत. मारहाण केल्यानंतर आरोपी पळून गेले.
 
गंभीर अवस्थेत राकेशला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी राकेशची पत्नी वैशाली रामटेके हिच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तीनही आरोपींना अटक केली. जरीपटक्याचे तत्कालिन दुय्यम पो. नि. बी. पी. सावंत यांनी याप्रकरणाचा तपास करून तीनही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले त्यात ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. न्यायालयात तीनही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश काझी यांनी तिघांनाही जन्मठेप आणि तिघांनाही ५० हजार रुपये दंड सुनावला.