शरद पोंक्षे यांची कर्करोगावर यशस्वी मात

    दिनांक :17-Jul-2019
मुंबई,
अभिनेते शरद पोंक्षे यांनी गेल्या काही महिन्यांपासून चित्रपट, नाटक, मालिकांतून ब्रेक घेतला होता. त्यांचं अचानक अशा पद्धतीनं मनोरंजनसृष्टीतून लांब जाणं बऱ्याच जणांना खटकलं होतं. शरद पोंक्षेंनी अचानक कामातून ब्रेक का घेतला असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अखेर त्याचं कारण पुढं आलं आहे. गेल्या डिसेंबरपासून ते कर्करोगानं त्रस्त असून त्यावर उपचार घेत होते. औषधोपचार आणि किमोथेरपीनं त्यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. 'हिमालयाची सावली' या नाटकात ते दिसणार आहेत.
 
 
'डिसेंबरमध्ये मला सारखा ताप येऊ लागला. सगळ्या तपासण्या केल्यानंतर कंबरेच्या भागात गाठी होऊन कॅन्सर झाल्याचं निदान झालं. या दरम्यान मी सोनाली बेंद्रे, इरफान खान यांच्या बातम्या वाचत होतो, सोशल मीडियावरील पोस्ट पाहत होतोच. पण मला माझ्या आजाराविषयी कोणालाही सांगायचं नव्हतं. मला कोणाचीही सहानुभूती नको होती. म्हणून मी सगळ्यांपासून लांब गेलो. सहा महिने औषधपचार, किमो थेरपी घेतल्यानंतर मी ठणठणीत बरा झालोय. असं ते म्हणाले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान आजारातून बाहेर पडण्यासाठी मला सावरकारांची मदत झाली असंही ते म्हणाले. 'सावरकरांनी अकरा वर्ष एका छोट्याश्या खोलीत काढली आणि मला फक्त तीन महिने काढायचे होते. मी सावरकर भक्त आहे आणि याचा मला खुप फायदा झाला. खुप पुस्तकं वाचली, राजेश देशपांडेंनी दिलेलं 'हिमालयाची सावली' हे नाटकं वाचून काढलं. विशेष म्हणजे मी या नाटकात काम करावं यासाठी राजेश आणि नाटकाचे निर्माते मी बरा होईपर्यंत थांबण्यासाठी तयार आहेत हे ऐकून खुप छान वाटलं होतं. असं ते म्हणाले.
ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या 'हिमालयाची सावली' नाटकात डॉ. श्रीराम लागू यांनी गाजवलेली नानासाहेबांची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे करत असल्याचं कळतंय.