पपईची लागवड

    दिनांक :17-Jul-2019
राज्यात अलिकडच्या काळात पपईच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत चाललं आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात येणारं आणि चांगलं उत्पन्न मिळवून देणारं असं हे पीक आहे. पपईच्या कच्च्या फळापासून काढलेल्या पेपेनचा औषधी आणि अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पेपेनला वाढती मागणी प्राप्त होते. पपईपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडे प्रामुख्यानं जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यात पपईचं उत्पादन घेतलं जातं.

 
 
पपईचं पीक उष्ण कटिबंधात जोमानं वाढत असलं तरी समशितोष्ण हवामानातही याचं उत्पादन चांगलं येतं. या पिकासाठी उत्तम निचर्‍याची, मध्यम काळी किंवा तांबडी आणि हवा राहणारी जमीन योग्य ठरते. त्यातल्या त्यात जांभ्या खडकात पपईची झाडं उत्तमरित्या वाढतात.
 
पपईची लागवड जून-जुलै, सप्टेंबर -ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात करतात. पपईची रोपं लागवडीसाठी 50 ते 60 दिवसात तयार होतात. लागवडीनंतर पपईची फळं 11 ते 12 महिन्यात काढणीस तयार होतात. पपईच्या पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकची सुविधा महत्त्वाची ठरते. ठिबकच्या वापरामुळे पपईच्या उत्पादनात वाढ होत असल्याचं दिसून येतं. त्याच बरोबर पपईची बाग तणविरहित रहावं यासाठी मल्चिंगचा वापर फायदेशीर ठरतो. पपईच्या बागेत मूग, उडीद, चवळी, वाटाणा, श्रावण घेवडा, सोयाबीन, भुईमूगआदी आंतरपीकं घेता येतात. पपईच्या एका झाडापासून किमान 40 ते 80 फळं मिळतात. तर याचं हेक्टरी उत्पादन 50 ते 80 मेट्रिक टनापर्यंत मिळतं.