शेतकर्‍यांसाठी वरदान धुर्‍यावरील वृक्ष...

    दिनांक :17-Jul-2019
पवनकुमार लढ्‌ढा
चिखली तालुक्यात वृक्षतोडीमुळे शेतशिवार ओसाड झाल्याचे चित्र दिसत आहे. शेतातील मोठ्या झाडांचे प्रमाण कमी झाले आहे. शेताच्या धुर्‍यावर असलेले झाड शेतकर्‍यांच्या दृष्टीने उपयोगी आहे. धुर्‍यावर झाड असेल, तर पालापाचोळ्यापासून खत तयार होईल. वाढत्या तापमानामुळे जमिनीवर व पिकावर होणारा दुष्परिणाम कमी होऊ शकतो, पाळीव जनावरांना सावली मिळेल, आंबा, चिंच, जांभूळ, साग या वृक्षांपासून शेतकर्‍यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे पाऊस पडण्यास मदत होऊ शकते. 

 
 
पूर्वीच्या काळी शेतात धुर्‍यावर असणारे झाड शेतकर्‍यांच्या दृष्टीने जीव की प्राण असायचे. धुर्‍यावरील झाडाचे संवर्धन योग्य प्रकारे केले जायचे. दरवर्षी झाडाच्या फांद्या छाटून त्याची वाढ होण्यासाठी पूरक प्रयत्न केले जायचे. त्यामुळे प्रत्येक शेतात आंबा, चिंच, बोर, बाभूळ व अन्य मोठे वृक्ष असायचे. वर्षातून एकदा झाडांची छटाई करून इंधन म्हणून वापर करीत होते. शेतीसाठी लागणारे लाकडी अवजारे याच झाडापासून तयार केली जायची. विशेष म्हणजे या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण व्हायचे.
 
धुर्‍यावरील झाडाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे या झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी घरटे तयार करून वास्तव्य करायचे. या पक्ष्यांकडून पिकांवर होणार्‍या घातक किडीपासून पीकसंरक्षण व्हायचे. त्यामुळे शेतकर्‍यांचा कीटकनाशकावरील होणारा खर्च वाचायचा. नंतरच्या काळात सावलीत पीक होत नाही, पक्षी पिकांचे नुकसान करतात, या समजुतीतून अनेक शेतकर्‍यांनी झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली. औद्योगिक पद्धतीने शेती करण्यावर शेतकर्‍यांचा कल वाढला.
 
ट्रॅक्टरने शेती करू लागले. त्यामुळे पडीत जमिनीत शेतावरील असलेले धुरे खोदून तिथे पीक घेण्यास सुरुवात झाली. शेतकर्‍यांचे शेतीला पूरक असलेले दुग्धव्यवसायासारखे जोडधंदे बंद झाले. पाळीव जनावरे ठेवणे शेतकर्‍यांना परवडणारे राहिले नाही. त्यामुळे पडीत जमिनीच्या शेतावरील धुर्‍यावर असलेली वृक्षतोड वाढली. आज शेतीच्या समतोल असलेला परिसर ओसाड झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे.