जीवलग सखा-मोबाईल!

    दिनांक :18-Jul-2019
अंजली आवारी
 
‘मोबाईल’ आपल्या सर्वांच्या आयुष्यातला महत्त्वाचा मित्र! हा मित्र असा आहे, जो आपल्या आयुष्यात चांगल्या-वाईट प्रसंगांचा साक्षीदार आहे. आपल्या कुटुंबातील खूप जवळचा मित्र बनून जातो. वा आपण असही म्हणू शकतो की, एकमेकांशी जोडले जाण्याचं, आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक घटनेशी तो आपल्याला अलगदपणे जोडतो. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनात नेहमी जागृत राहतो.
 
मोबाईलमधून व्हॉट्‌सॲप, फेसबुक, मॅसेन्जर, टि्‌वटर, लिंक्डईन यासारख्या माध्यमांद्वारे आपल्याला क्षणार्धात इकडची माहिती तिकडे करता येते. एकमेकांचे विचार जाणण्याचं हे महत्त्वाचं साधन आहे. भारतीय राज्यघटनेद्वारे नागरिकांना मिळालेला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आपण या माध्यमांद्वारे अगदी प्रखरतेने वापरू शकतो. समाजाप्रती जागृक असण्यासाठी या माध्यमांचा वापर करता येणे, ही काळाची गरज आहे. शासनाचे कित्येक निर्णय त्यांच्या योजना व त्यांची अंमलबजावणी ही फोनमधील निरनिराळ्या ॲपद्वारे होत असते. 

 
 
आज सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत असल्यामुळे आपणास क्षणोक्षणी मोबाईलची गरज भासते. यांच्यामुळे चुटकीसरशी घरबसल्या आपली कामे होतात. यात आपला वेळही वाचतो आणि कष्टही वाचतात.
 
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू थसतात. त्याचप्रमाणे इथेही आहेतच. मोबाईल जितका आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, तितकाच तो आपल्यासाठी घातकही आहे. इतका घातक की, तो प्राणही घ्यायला मागेपुढे पाहत नाही. मोबाईलमधून निघणार्‍या किरणांमुळे कॅन्सरसारखे भयंकर आजार होतात. हे आपणास माहीत आहेच.
 
लहान मुलांवरही याचे गंभीर परिणाम होतात हे आपण जाणतोच. पण त्यावर आपण काहीच उपाय शोधत नाही. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे मोबाईल आपला सोबती जरी असला तरी आयुष्य फक्त त्याच्या भोवतीच फिरायला नको.
 
आपण जरी त्याच्यमुळे जोडले जात असलो, तरी आपला मित्रपरिवार, कुटुंब एकत्र असताना आपण मोबाईलमुळे दुरावणार नाही, याची काळजी आपणच घ्यायला हवी. मोबाईल आपले आयुष्य नक्कीच सुकर करतोय्‌ पण त्यामुळे आपण आपल्या वास्तविक आयुष्यापासून दुरावत जाऊन, काल्पनिक जगात जगतोय्‌ असं वाटतय्‌. आपण शेअर, लाईक्‌स आणि कॉमेन्ट्‌स यावरच जगतोय्‌.
 
म्हणून मित्रांनो, मोबाईलला आपला मित्र, सोबती, सखा नक्कीच माना. पण त्यामुळे आपले जिवंत हाडामासाचे मित्र गमवू नका. कुटुंबातील व्यक्ती-व्यक्तीमधील नात्यात अंतर येणार नाही, याची काळजी घ्या. मोबाईलचे दृष्परिणाम आपल्या आयुष्यावर न होता त्याचा फायदा करून घ्या म्हणजे खर्‍या अर्थाने आयुष्य सुकर होईल.