मानसिक तणाव घातकच!

    दिनांक :18-Jul-2019
प्रा. मधुकर चुटे
 
आपल्या देशात गेल्या काही वर्षांत, आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच झाले पाहिजे, अशा अतिमहत्त्वाकांक्षेचे भूत पालकांच्या मानगुटीवर बसल्याने, हजारो किशोरवयीन मुलांचे भावी जीवन मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येते. आपल्या मुलावर आपल्या महत्त्वाकांक्षा सक्तीने लादू नका, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिकू द्या, मुलांची होरपळ करू नका, अशी आवाहने शिक्षण आणि वैद्यकीयतज्ज्ञांनी वारंवार करूनही काहीही उपयोग झालेला नाही. इंग्रजी माध्यमातूनच आपल्या मुला-मुलींना शिकवायचे, इंग्रजी शाळेतून शिकल्यास, त्याला फाड फाड इंग्रजी बोलता येईल, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवल्याशिवाय भावी जीवनातील आव्हानांना त्यांना सामोरे जाताच येणार नाही, अशा समजुतीने घेरलेल्या पालकांनी आपली मुले चार-पाच वर्षांची असतानाच, त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे जड ओझे लादायचा तडाखा लावला आहे.

 
पहिलीपासूनच खाजगी ट्युशन्स लावायच्या, मुलांना खेळण्यासाठीही वेळ द्यायचा नाही, त्याच्या बोकांडी सतत अभ्यासाचे भूत बसवायचे आणि शालेय जीवनापासूनच तथाकथित मेरिटच्या दुष्टचक्रात त्याला अडकवायचे, अशी सामाजिक मानसिकता वाढल्यामुळे, अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या. आपल्या मुला-मुलींची बौद्धिक कुवत किती, त्याला शाळेतला अभ्यासक्रम पेलवतो काय? याचा विचारही बहुतांश पालक करीत नाहीत. दहावीची परीक्षा संपताच, आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनीअरच करायच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले पालक, बारावीनंतरच्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासात गुंतवून टाकतात. आयआयटीच्या आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या चाचणी परीक्षांना बसणार्‍या दहा-वीस लाख विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतल्यास, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या जोखडात कसे अडकवले जाते, हे लक्षात येते.
 
आयआयटीमधून इंजिनीअर होणे हे पालकांच्या दृष्टीने सामाजिक प्रतिष्ठेचे ठरल्यामुळेच, आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणार्‍या कोचिंग क्लासेसची संख्याही देशभरात प्रचंड वाढली आहे. राजस्थानातील कोटा शहरात, आयआयटीच्या प्रवेश परीक्षा तयारीच्या कोचिंग क्लासेसची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. शहरातील या कोचिंग क्लासेसच्या कारखान्यात देशभरातील दीड लाखांच्या वर विद्यार्थी शिकत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने आयआयटीच्या प्रवेश परीक्षांना बसणार्‍यातील काही हजारच मेरिटमध्ये येतात. उरलेल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांच्या पदरी हमखास यश, अशी जाहिरात करणार्‍या कोचिंग क्लासमध्ये शिकूनही निराशाच येते.
 
निराशेने घेरलेल्या विद्यार्थ्यांना पालकांकडून आपला मानसिक छळ होईल, अशी भीती वाटते. परिणामी, कोटा शहरातील आयआयटी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थी प्रवेश न मिळाल्यामुळे तणावाखाली आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतात. देशभरातील विद्यार्थी लाखो रुपयांची फी भरून या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. त्यांच्यावर अभ्यासाचा अतिरेकी ताण क्लासच्या संचालकांकडून टाकला जातो. हजारो विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन अभ्यासाच्या या अतिरेकामुळे बिघडते. परिणामी, त्यातील काही विद्यार्थी निराशेने मृत्यूला कवटाळतात, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
पालकांच्या इच्छेनुसार शिक्षणाचे क्षेत्र निवडण्याच्या त्रासापेक्षा मृत्यूला कवटाळणे विद्यार्थ्यांना अधिक शांततापूर्ण आणि सोपे वाटते, हे गंभीर आहे. पालकांनो, आपली अपेक्षा मुलांवर लादून त्यांचा जीव संकटात आणू नका, त्यांचा मौल्यवान जीव महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना ताणतणावात ठेवणे योग्य नाही, हे पालकांना समजले-उमजले, तरच या नव्या समस्येवर मात करता येईल, असे वाटते.