अशोक मामांची ‘अश्विनी’ पुन्हा येणार

    दिनांक :18-Jul-2019
अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘गंमत जंमत’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. १९८७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणं त्याकाळी विशेष गाजलं. इतकंच नाही, तर आजही हे गाणं प्रेक्षकांच्या ओठांवर गुणगुणताना दिसतं. विशेष म्हणजे या गाण्यातील रंगत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना नव्याने अनुभवता येणार आहे. आगामी ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटामध्ये हे गाणं नव्याने सादर करण्यात येण्यात आहे.
‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ३२ वर्षानंतर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी ‘ये रे ये रे पैसा २’ च्या म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हे गाणं नव्याने सादर करण्यात आलं.विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये अशोक सराफ, चारुशीला साबळे आणि सचिन पिळगांवकर उपस्थित होते.

‘अश्विनी ये ना…’ हे गाणं ३२ वर्षांनी ऐकल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी ज्या पद्धतीने त्याचा ताल, चाल होती यासाठी संगीतकार अरूण पौडवाल यांना सलाम आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं हे पहिलं मराठी गाणं होतं. मराठी चित्रपट संगीतातलं हे माईलस्टोन गाणं आहे. सचिन पिळगांवकर यांनी या गाण्यातल्या स्टेप्स बसवल्या होत्या. हे गाणं चित्रीत करताना मजा आली होती. जवळपास एकाच टेकमध्ये प्रत्येक स्टेप ओके झाली होती. त्यावेळी हे गाणं इतकं लोकप्रिय होईल असं वाटलं ही नव्हतं. या गाण्याने खूप लोकप्रियता दिली,’ असं अशोक सराफ आणि चारुशीला साबळे म्हणाल्या.
दरम्यान, ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केलं असून चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.