शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस यांची तरुण भारतला सदिच्छा भेट

    दिनांक :18-Jul-2019
- ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’तील कलावंतांनी सांगितला अनुभव
 
नागपूर,
एखादी मालिका यशस्वी होते तेव्हा प्रामुख्याने त्यात भूमिका करणारे कलावंत समोर दिसतात. पण केवळ कलावंतांमुळेच मालिका यशस्वी होत नसते तर या प्रक्रियेत जुळलेल्या सर्वच लोकांचे परिश्रम त्यामागे असतात. लेखक, दिग्दर्शक, कलावंतांपासून स्पॉट बॉयपर्यंत सगळ्यांचेच काम महत्त्वाचे असते. आम्हाला त्याची नम्र जाणीव आहे, असे मत ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस यांनी व्यक्त केले. 
 
 
शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस यांनी आज गुरुवारी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सर्व संपादकीय सहकार्‍यांसह त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना मालिकेची माहिती दिली. तरुण भारततर्फे त्यांचे स्वागत शहर संपादक चारुदत्त कहू यांनी केले. ही मालिका सध्या एका अस्वस्थ वळणावर आली आहे. अशा वेळी सिद्धार्थ मित्र म्हणून की नवरा म्हणून आवडेल? या प्रश्नावर मृणाल अर्थात मालिकेतील अनुश्री म्हणाली, मला तो मित्र म्हणूनच आवडेल कारण अद्याप लग्नासाठी त्याला मी होकार दिलेला नाही. विधवा असल्याने मालिकेतल्या अनु या भूमिकेला बर्‍याच मर्यादा आहेत. पण विधवांनाही जगण्याचा अधिकार आहे, हे सांगणारी ही मालिका आहे. 

 
 
तर शशांक केतकर म्हणाला, यापूर्वीच्या मालिकेतील श्री ची भूमिका संपूर्ण वेगळी होती आणि या मालिकेतील भूमिका वेगळ्या धाटणीची आहे. दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या विधवेवर प्रेम असल्याने सिद्धार्थला त्याच्या घरात विरोध होतो आहे. तिच्यासाठी त्याने घर, व्यवसाय सोडला आहे. पण प्रेमावरचा विश्वास कायम आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही दोघांचे लग्न व्हावे असे वाटत असले तरी मालिका पुढे कुठे जाणार हे आम्हालाही माहीत नाही. 

 
 
मृणाल म्हणाली, व्यक्तिगत आयुष्यात असे अनुभव अनेकांना येतात. त्यामुळे आमच्या भूमिका वास्तविकतेशी जुळल्या आहेत. ही भूमिका करताना त्रास झाला नाही. कारण सार्‍याच मानवी भावना आपण आपल्या आयुष्यात जगतच असतो. या मालिकेचा चांगला परिणाम होतो आहे. आमच्या लेखिका काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली आहे. कथेचा मूळ धागा कुठेच हरवणार नाही, याची काळजी मालिकेत घेण्यात आली असल्याने आणि ज्येष्ठ कलावंतांसह काम करता येत असल्याने बरेच शिकायलाही मिळते आहे, असे मृणाल म्हणाली. यापूर्वी प्रायोगिक नाटकात भूमिका केली पण आता व्यावसायिक नाटकात भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असे मत तिने व्यक्त केले. शशांक केतकर म्हणाला, मी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकात भूमिका केली आहे. नागपुरातही तीन प्रयोग केलेत तर आताही एक नवीन नाटक येते आहे. 
  
विदर्भातल्या कलावंतांनाही संधी
मुंबई हे कलावंतांसाठी एकमेव केंद्र आहे. त्याला पर्याय नाही. त्यामुळे विदर्भातल्या कलावंतांनी मुंबईत यायला हरकत नाही. त्याशिवाय नागपूर हे देखील मालिका आणि चित्रपटांचे केंद्र व्हावे. येथील निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी येथे मालिका आणि चित्रपट तयार केलेत तर मुंबईचे कलावंत येथे येऊन त्यात काम करतील. शिवाय आपल्यातली गुणवत्ता कळण्यासाठी सतत लोकांसमोर येत राहणे आवश्यक आहे, असे मत मृणाल आणि शशांकने व्यक्त केले.