अखेर ‘त्या’ शिक्षिकेला केले निलंबित

    दिनांक :18-Jul-2019
सेन्ट अ‍ॅन्स पब्लिक स्कूलमधील मारहाण प्रकरण 

 

वरोडा, 
शाळेतील एलकेजीच्या चिमुकलीला मारहाण करणार्‍या प्रकरणाची दखल राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे आणि शिक्षण विभागाने घेताच शाळा व्यवस्थापनाने ‘त्या’ शिक्षिकेला बुधवारी निलंबित केले.
 
व्दारकानगरीतील सेन्ट अ‍ॅन्स पब्लिक स्कूलमध्ये एलकेजीमध्ये शिकणार्‍या चिमुकलीला ‘अ‍ॅपल’ या इंग्रजी शब्दाचे स्पेलींग लिहता न आल्याने शिक्षिकेचा राग अनावर झाला आणि तिने चिमुकलीला पाठीवर वळ येईपर्यंत चोप दिला. ही बाब पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ब्लेसी पिटर यांना विचारणा केली. यानंतर शाळेने शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस देवून थातूरमातूर चौकशी केली. सोशल मिडीयावर हे प्रकरण व्हायरल होताच शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांनी शाळा गाठली आणि शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शाळेतील इतर समस्यांवरही त्यांनी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली. या संबंधीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने गटशिक्षणाधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आले.
 
बुधवारला गटशिक्षणाधिकारी प्रकाश धवंगळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला पत्र देवून प्रकरणाबद्दल गंभीर कारवाई करण्याचे सांगितले. या प्रकरणात संबंधीत मुख्याध्यापिकेवरही कारवाई प्रस्तावित असून, यापुढे असा प्रकार घडल्यास नियम 17 सी अन्वये शाळेची मान्यता रद्द का करण्यात येवू नये? अशी नोटीस शाळेला बजावल्याचे धवंगळे यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराने पालकवर्ग त्रस्त असून, त्याची दखल न घेतल्यास यापुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला.