कत्तलीसाठी जाणाऱ्या ६८ गोवंश गुरांना जीवदान

    दिनांक :19-Jul-2019
अंजनगांव मार्गावर शहर पोलिसांची धाडसी कारवाई
अकोट,
शहरालगतच्या अंजनगांव मार्गावर शुक्रवार ( १९ जुलै ) रोजी पहाटे शहर पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून कत्तलीसाठी जाणाऱ्या सुमारे १० लाख २० हजार रुपये किंमत असलेल्या ६८ गोवंश गुरांना जीवदान दिले आहे. गत वर्षापासून अकोट परिसरातून कत्तलीसाठी गोवंश वाहतूक व गोवंश मांस तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांवर शहर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रीत करुन अनेक कारवाया केल्या आहेत. विशेषतः मागील काळात वनपरिक्षेत्रामार्गे गुरांची अवैध वाहतूक होत असे. त्यावरही बऱ्यापैकी लगाम लावण्यात आला आहे. 
 
शुक्रवारी गोपनिय माहितीच्या आधारावर उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार संतोष महल्ले यांच्या नेतृत्वात तातडीने पथक गठीत करुन अंजनगांव मार्गावर सापळा लावला. पहाटेला माऊली ढाब्यासमोर अकोटकडे सुमारे ६८ गोवंशाची वाहतूक करणारे चार तस्कर या सापळ्यात अडकले. या गुरांना क्रुरतेने दोरीने जखडून बांधण्यात आले होते.
 
या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या चार जणांची चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांच्या जवळ गोवंश गुरांच्या मालकी हक्काची कागदपत्रे सुध्दा नव्हती. या गोवंश गुरांना पंचासमक्ष जप्ती पंचनाम्यांतर्गत स्थानिक गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देऊन संस्थेवर त्यांच्या पालन,पोषण व संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली.या प्रकरणी आरोपींविरुध्द शहर ठाण्यात अपराध क्रमांक २९६/१९ अन्वये कलम ५,५(अ),५(ब),९ प्राणी संरक्षण अधिनियम,सहकलम ११,च,ज,झ प्राण्यांना क्रुरतेने वागवणे प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.नजिकच्या इतिहासातील शहर पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते.