सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वश्रेष्ठ मंत्री

    दिनांक :19-Jul-2019
 
‘फेम इंडिया’ने केला मुनगंटीवारांचा गौरव 

 
चंद्रपूर, 
'फेम इंडिया'ने एशिया पोस्ट या प्रसिध्द पाहणी संस्थेच्या मदतीने केलेल्या पाहणीत महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अनुभवी मंत्री या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ मंत्री म्हणून गौरव केला आहे. अर्थ, नियोजन व वनमंत्री म्हणून त्यांची कामगीरी अत्यंत चांगली असून, यापूर्वीही त्यांच्या कामामुळे त्यांचा ठिकठिकाणी गौरव झाला आहे. वनमंत्री कसा असावा, याचा तर त्यांनी वस्तूपाठच आखून दिला आहे.
 
फेम इंडियाने सर्वश्रेष्ठ मंत्री 2019 या गौरवासाठी एक पाहणी अहवाल सादर केला. व्यक्तीमत्व, प्रतिमा, कार्यक्षमता, प्रभाव, मंत्रालयीन विभागाच्या कामकाजाची जाण, लोकप्रियता, दूरदृष्टी, कार्यशैली आणि परिणाम या सात मुद्यांच्या अनुषंगाने देशातील सर्व राज्यांच्या मंत्र्यांचा 21 विविध वर्गवारीत अभ्यास केला गेला. या सर्व्हेमध्ये देशभरातील अंदाजे 12700 प्रबुध्द नागरिकांची मते घेण्यात आलीत. या माध्यमातून विविध राज्यातील 21 मंत्र्यांना सर्वश्रेष्ठ मंत्री म्हणून गौरविण्यात आले आहे. यात अनुभवी मंत्री या श्रेणीत महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे.
 
राज्याचे अर्थ, नियोजन आणि वने आणि विशेष सहाय्य या विभागांच्या मंत्रीपदाची धुरा सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या 5 वर्षात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनमानसात उमटवला आहे. अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले असून, महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे पाच लोककल्याणकारी अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने घेतलेली आघाडी मुनगंटीवार यांच्या कार्यक्षमतेचेच फलित आहे. गेल्या 5 वर्षात आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल इंडिया टुडे समुहाने दोनवेळा त्यांचा गौरव केला आहे. त्यांचे मंत्री कार्यालय देशातील पहिले आएसओ मानांकित कार्यालय ठरले आहे. राज्याच्या अर्थ, नियोजन व वन खात्याची धुरा सांभाळताना जनतेशी असलेले स्नेहबंध त्यांनी कायम राखले आहे. त्यांच्या कार्यालयात येणार्‍या अभ्यांगतांची गर्दी हे स्नेहबंध अधोरेखित करणारे आहे. नागरिकांशी, कार्यकर्त्यांशी असलेले भावनिक नाते जपत अजातशत्रू अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
 
वनमंत्री म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत एकेकाळी दुर्लक्षित असलेला वनविभाग आज मुख्य प्रवाहात आणत, या विभागाचे महत्त्व वाढविण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे. हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला. या निर्धाराची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात वनविभागाने विक्रमी वृक्ष लागवड केली. लिम्का बुक ऑफ रेकार्डने या विक्रमाची नोंद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुध्दा ‘मन की बात’ या कार्यक्रमात या वृक्ष लागवड मोहीमेचे कौतुक केले. यावर्षी तीन महिन्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम त्यांच्या नेतृत्वात राज्यभर राबविण्यात येत आहे.
 
त्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या ‘मिशन शौर्य’ या उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील 4 आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टसारख्या उंच शिखरावर झेंडा फडकविला. स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्‍या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी मिशन सेवा हा उपक्रम राबवत जिल्ह्यात अभ्यासिकांचे जाळे त्यांनी विणले आहे. मिशन शक्तीच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्रीडा संकुले अद्यावत करुन त्या माध्यमातून आगामी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू पदक प्राप्त ठरावे यासाठीची योजना त्यांनी आखली आहे. देशातील अत्याधुनिक अशी सैनिक शाळा चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांनी उभारली आहे. देशातील सैनिकी शिक्षणाच्या प्रक्रियेत मैलाचा दगड ठरावा, अशा पध्दतीची अप्रतिम सैनिकी शाळा त्यांच्या संकल्पनेतून व परिश्रमातून उभी झाली आहे.
 
मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले लोकहितकारी निर्णय व त्या माध्यमातून साधलेली महाराष्ट्राची प्रगती यासाठी ‘द व्हॉईस’ या वृत्तसंस्थेने ‘बेस्ट परफॉर्मिंग मिनीस्टर’ हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कारसुध्दा त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव करणारा ठरला. विक्रमी वृक्षलागवड मोहीमेसाठी त्यांना विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.