आणिबाणीतला यशस्वी संघर्ष

    दिनांक :19-Jul-2019
प्रमिला मेढे
पूर्व प्रमुख संचालिका, राष्ट्र सेविका समिती
 
आणिबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वाधिक निंदनीय आणि दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते. 1975 ते 1977 या कालावधीतील त्या 21 महिन्यांची आठवण सहज जरी झाली तरी अंगावर काटे येतात. त्या आठवणीसुद्धा नको वाटतात. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सगळी लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून देशावर आणिबाणी लादली होती. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली होती. नागरिकांचे स्वातंत्र्य मर्यादित केले होते. विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक संघटनांवर बंदी आणली होती. वृत्तपत्र स्वातंत्र्यावरही घाला घालण्यात आला होता. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण सांगत इंदिरा गांधींनी आणिबाणी लादत सर्व अधिकार स्वत:कडे घेतले होते. देशभर दमनचक्र सुरू होते. असे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डगमगला नव्हता. 
 
 
संघाने आणिबाणीविरुद्ध लढा पुकारला होता. संघाच्या बहुतांश पदाधिकार्‍यांची धरपकड होऊन त्यांना कारागृहात डांबण्यात आले होते. पण, जे कार्यकर्ते बाहेर होते, त्यांनी आणिबाणीच्या विरोधात मोहीम उघडली होती. पकडले जाऊन तुरुंगात पाठविले जाऊ शकतो, याची जाणीव असतानाही असंख्य कार्यकर्ते भूमिगत होऊन कार्यरत होते. कारण, संघ ही सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारी संघटना होती आणि आहे. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, असे कुठलेही कृत्य संघाने कधीच केले नव्हते. त्यामुळे इंदिरा गांधींच्या दडपशाहीविरुद्ध संघाचा लढा अविरत सुरू होता. अखेर, त्या लढ्याला यश आले आणि 1977 सालच्या मार्च महिन्यात आणिबाणी हटवली गेली, कारण नसताना तुरुंगात डांबण्यात आलेल्या हजारो संघ कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची सुटका झाली. पण, हे सगळे जेलमध्ये असताना त्यांच्या कुटुंबीयांना काय यातना भोगाव्या लागल्या, बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना काय त्रास सहन करावा लागला, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.
 
आणिबाणीत संघावर बंदी घालण्यात आली होती. पण, राष्ट्र सेविका समितीवर प्रत्यक्ष बंदी नव्हती. अघोषित बंदी होती. समितीच्या धंतोलीतील कार्यालयावर सरकारचे बारीक लक्ष होते. त्यामुळे समितीच्या सेविकांनाही उघडपणे संघ स्वयंसेवकांना मदत करता येणे शक्य नव्हते. धंतोलीत देवी अहल्या मंदिर येथील समितीच्या कार्यालयाच्या आसपास काही पानठेले होते. काही सायकल रिक्षावाले उभे राहायचे. ऑटोरिक्षा तर एखाद-दुसराच होता. पानठेला चालवणारे आणि रिक्षावाले तसे बदनाम समजले जायचे. पण, समितीच्या कार्यालयाच्या आसपास असे जे लोक होते ना, त्यांनी आणिबाणीच्या काळात समितीचे रक्षक म्हणूनच भूमिका बजावली होती. सरकारदरबारी काय शिजतंय्‌ याची गोपनीय माहिती हे लोक आम्हाला पुरवायचे आणि त्यामुळे आमच्या मनातली नेमकी योजना कशी अंमलात आणायची, याची दिशा आम्हाला मिळायची.
 
आणिबाणीच्या काळात रिक्षेवाल्यांचे समितीला खूपच सहकार्य मिळाले. त्यांना नागपूरच्या गल्ल्या व अंतर्गत रस्ते माहीत असल्याने कुणी पाठलाग केला तरी तो यशस्वीपणे चुकवून ते समितीच्या सेविकांना गंतव्यस्थळी यशस्वीपणे पोहोचवायचे. सेविकांना कुठे जायचे असेल, यायचे असेल तर सुरक्षित ने-आण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी खरोखरच मनापासून मदत केली. पैसे अन्‌ निरोप पोहोचविण्यात देखील त्यांचे मोठे सहकार्य मिळाले. आणिबाणीत सरकार संघ परिवाराच्या विरोधात होते हे खरे असले तरी जनता सोबत होती. जनतेच्याही मनात सरकारबद्दल असंतोष होता. त्यामुळे अनेक कामं आपोआपच सोपी व्हायची. समितीवर प्रत्यक्ष बंदी नसली तरी सरकार बारीक लक्ष ठेवून असल्याने आम्ही उघडपणे भगवा ध्वज लावून शाखा भरवत नसू. आणिबाणीत सरकारी अत्याचार फार मोठ्या प्रमाणात झाले. त्याचे घाव स्वयंसेवक, त्यांच्या कुटुंबीयांनी सोसले. त्याचे व्रण आजही मिटलेले नाहीत, त्या क्रूर परिस्थितीच्या कडू आठवणी अजूनही मनात घर करून आहेत. विविध कटू प्रसंग जेव्हा आठवतात, तेव्हा अंगावर शहारे येतात. त्या दुर्दैवी क्षणांचा विचारसुद्धा मनाला त्रास देऊन जातो.
 
मी त्यावेळी समितीची प्रमुख कार्यवाहिका होते. त्यामुळे माझ्यावर या नात्याने जबाबदारीही मोठीच होती. जे स्वयंसेवक बंधू तुरुंगात होते, त्यांच्या घरच्या स्त्रियांची काळजी कशी घेता येईल, त्यांना धीर कसा देता येईल, त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची आबाळ होणार नाही याची काळजी कशी घेता येईल, यावर समितीत सातत्याने राष्ट्रीय पातळीवर मंथन होत होते आणि यथाशक्ती मदतीचे प्रयत्न होत होते. शाखा उघडपणे भरवता येत नव्हती, भगवा ध्वज फडकवता येत नव्हता. पण, एकत्र तर जमायचेच हा आमचा निर्धार असे. त्यावेळी आम्ही अगदी छोटा ध्वज सोबत ठेवत असू आणि जिथे सुरक्षित जागा मिळेल तिथे एकत्र येत असू. त्या एकत्रिकरणात जमलेल्या भगिनींना वेगवेगळ्या गोष्टी सांगणे, संस्कृती समजावून सांगणे असे उपक्रम राबविले आणि त्यातून आणिबाणीविरुद्ध जागरण केले. बंकिमचंद्रांनी लिहिलेल्या वंदे मातरम्ला शंभर वर्षे पूर्ण झाली होती. त्यावर समितीने स्टीकर्स तयार केली आणि ती विकली, आलेल्या पैशांतून आणिबाणीतल्या संघर्षनायिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंदांवर भाषणं तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करूनही महिलांना एकत्र आणणे, निरोपांची देवाणघेवाण करणे आणि गरजूंना पैसे देणे अशी अतिशय महत्त्वाची कामं समितीला त्या काळात करता आली. वातावरण तंग होते. परिस्थिती तणावपूर्ण होती. सरकारचे दमनचक्र सुरू होते. पकडले गेलो तर हाल होतील, तुरुंगाची वाट धरावी लागेल याची जाणीव असूनही समितीच्या सेविका अतिशय धाडसाने पण तेवढ्याच संयमाने आपले कार्य पुढे रेटत होत्या. वंदे मातरम्‌ आणि स्वामी विवेकानंदांवरील भाषणांना सरकारने आक्षेप घेतला होता. हे सगळे आताच का, असा सवाल विचारला गेला. समितीनेही दमदार उत्तरं देत आपल्या आयोजनांचे समर्थन केल्याने सरकरच्या हाती कधी काही लागले नाही. असे असले तरी काही ना काही कारण शोधून सरकारचे प्रतिनिधी समितीच्या कार्यालयात यायचे आणि तुम्ही संघाला मदत करता असे म्हणायचे. पण, त्यांना आरोप कधीच सिद्ध करता आला नाही. त्यामुळे आमचे काम अव्याहत चालूच राहिले. समितीच्या सेविका कुणालाही कशाचा पत्ता लागू न देता अविरतपणे संघर्षरत राहिल्या आणि आपल्या परीने संघाला मदत करीत राहिल्या. कुठेही स्वार्थ नाही, कुठेही अहंकार नाही, कुठेही अहंभाव नाही. जे काही चालले होते ते इदं न मम राष्ट्राय स्वाहा, असेच होते.
 
नागपुरातले अनेक संघ स्वयंसेवक आणि पदाधिकारी आणिबाणीत पुण्याच्या कारागृहात होते. आपल्या आप्तांना भेटायला जायचे तर त्यासाठी पैसे हवे, शिवाय पुण्यात राहायचे कुठे ही समस्या होतीच. पण, त्यावरही तोडगा निघाला होता. वंदनीय ताई आपटे यांचे घर पुण्यात होते. पुण्यात ताईंच्या घरी राहण्याची सोय होत असे. ताईसुद्धा अतिशय आदराने, प्रेमाने सगळ्यांचे स्वागत करायच्या, त्यांना धीर द्यायच्या, त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायच्या. मायेचा असा ओलावा मिळाल्याने संघर्षनायिकांनाही त्यांचे दु:ख हलके झाल्यासारखे वाटायचे. ज्या भगिनींची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, अशा भगिनींना नागपुरात काही ना काही काम दिले जायचे आणि त्या कामाबद्दल मदत म्हणून जे पैसे त्यांना मिळत असत, त्यातून तिकीट काढून या भगिनी नाशिक-पुणे येथे जाऊन तिथल्या तुरुंगात असलेल्या आपल्या पतीला, मुलाला, भावाला भेटून येत असत. हे जे काम समितीकडून सुरू होते, त्यातही अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. पण, न डगमगता सेविकांनी काम केले, त्यामुळे संघर्षनायिकांचे जीवन थोडे का होईना, सुकर होण्यास हातभार लागला हे नक्की!
 
बाळू मोतलग वगैरे मंडळी त्या काळात भल्या पहाटे आम्हाला भेटायला समितीच्या कार्यालयात यायचे. त्यांच्याशी विचारविनिमय होऊन पुढल्या कामाची दिशा ठरायची. जे काही होत होते, ते अतिशय गोपनीयरीत्या होत असल्याने सरकारला त्याची खबर कधीच लागत नसे. आणिबाणीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी सत्याग्रह केला जायचा. त्या सत्याग्रहात तुकड्यातुकड्यांनी महिला सहभागी व्हायच्या. कुणाला कधी आणि कुठल्या सत्याग्रहात पाठवायचे याचा निर्णय आमच्या बैठकांमध्ये होत असे. समाजवादी नेते एस. एम. जोशी एका बैठकीत उपस्थित होते. मीसुद्धा आबाजी थत्तेंसोबत त्या बैठकीला गेले होते. त्यावेळी जोशी असे म्हणाले होते की, रोजच्या रोज कार्यकर्त्यांच्या तुकड्या सत्याग्रहात पाठविणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे आमच्या संघटनेच्या किती लोकांना सत्याग्रहात पाठवायला हवे, त्याचा आकडा सांगा, आम्ही तेवढे कार्यकर्ते एकाच दिवशी पाठवू. दरम्यानच्या काळात सुमतीताई सुकळीकर यांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले. त्यामुळे महिला सत्याग्रहींच्या नावांची यादी आणि कुणी कुठल्या सत्याग्रहात सहभागी व्हायचे याची योजनाही आमच्याकडे नव्हती. ती ताईंकडे असल्याने थोडी पंचाईत झाली होती. पण, धरमपेठेतील श्री गजानन महाराज मंदिरात त्यानंतर नियमित बैठका होऊ लागल्या. त्या बैठका वाटू नयेत आणि सरकारला संशय येऊ नये यासाठी भजन-कीर्तन-प्रवचनांचे आयोजन केले जात असे. त्या माध्यमातून जनजागरण केले जात असे. आमची जी काही योजना असे, ती या माध्यमातून भगिनींपर्यंत आणि भगिनींच्या माध्यमातून संघाचे भूमिगत असलेले पदाधिकारी आणि तुरुंगात असलेले पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचविण्यात मदत होत असे. हे फार मोठे आणि महत्त्वाचे काम होते. त्यावेळी समन्वय नावाचा वेगळा विषय वा विभाग नव्हता. तरीही समन्वयाचे काम अतिशय प्रभावीरीत्या होत होते.
 
एक प्रसंग मला आठवतो. पांडुरंगपंत क्षीरसागर यांचा ठाणे येथे मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव धरमपेठेत आणले गेले होते. अन्त्यसंस्कार व्हावयाचा होता. आबाजी थत्ते त्यावेळी नागपुरातच होते. त्यांना अन्त्यसंस्काराला जाण्याची इच्छा होती. पण, वंदनीय मावशी केळकर यांनी त्यांना तिथे जाण्यातला धोका सुचविला. पण, आबाजींना मोह आवरला नाही. भावनावेग दाटून आल्याने ते धोका पत्करून तिथे गेलेत आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. सरकारकडून प्रचंड दडपशाही सुरू होती. खरेच, अतिशय कठीण काळ होता तो. केव्हा काय प्रसंग घडेल अन कुणावर काय संकट ओढवेल, काहीच नेम नसे.
 
भजन-कीर्तन-प्रवचन या माध्यमातून महिलांना एकत्र करणे, ताज्या घडामोडींविषयी अवगत करणे, कुणी काय काम करायचे याविषयी मार्गदर्शन करणे, अशी कामे देशभर चालली होती. प्रांता-प्रांतांमध्ये भेटीगाठींचे कार्यक्रम सुरू होते. आप्तस्वकीयांना तुरुंगात भेटीसाठी वारंवार जात असल्याने पोलिस, पत्रकार, अधिकारी यांच्याशी ओळख वाढली होती. त्याचा फायदाच झाला. भेटीगाठी अधिक सोप्या झाल्या. संवाद वाढल्याने त्रास कमी झाला. तत्कालीन महत्त्वाच्या विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन करून महत्त्वाच्या व्यक्तींची भाषणंही व्हायची. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांचा पहाराही लावला जात असे. आम्ही काय बोलतो याकडे लक्ष ठेवून त्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्याची जबाबदारी त्यांची असे. पण, जे पोलिस तैनात असायचे ना, त्यांना आम्ही काय बोलतोय्‌ हे कळायचेच नाही अनेकदा. त्यामुळे ते आम्हाला विनंती करायचे की काय झाले ते सांगा ना कृपा करून! आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, अशी विनवणी ते करायचे. मग आम्ही त्यांना जुजबी माहिती देऊन मोकळे व्हायचो. त्यामुळे कुठले संकट कधी ओढवले नाही. सगळे कसे निष्कंटकपणे पार पडायचे.
 
राजकारण आणि समाजकारण यात धर्माचे स्थान हे अढळ आहे. त्याला तोड नाही. कारण, आणिबाणीच्या काळात आम्ही धार्मिक कार्यक्रम आयोजित करूनच महिलांना एकत्र आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले आणि ते उपयोगी सिद्ध ठरले. असं म्हणतात की महिलांच्या पोटात काही राहात नाही. त्या एकमेकींना माहिती सांगतातच. पण, आणिबाणीच्या संघर्षकाळात कधीही कुणी महिला फितूर झाली नाही. ठरवलं तर सगळं शक्य आहे, आमच्या माताभगिनी अत्युच्च कामगिरी करून दाखवू शकतात, हे प्रत्यक्ष कृतीने सिद्ध झाले होते. आणिबाणीच्या काळात महिलांनी केलेल्या योजनाबद्ध कार्यामुळे महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. शेवटी धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, हेही सिद्ध झाले होते. कारण धार्मिक कार्यक्रमांच्या मंदिरांमधील आयोजनातूनच आम्हाला त्याकाळी योजनाबद्ध रीतीने आणिबाणीच्या विरोधात यशस्वी लढा देता आला होता.