स्वाईन फ्लूचा खर्च टाळायचा तर...

    दिनांक :19-Jul-2019
स्वाईन फ्लूचे बरेच रूग्ण औषधोपचार आणि आराम यामुळे बरे होत असले तरी या विकाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर विविध प्रकारचे उपचार घ्यावे लागतात. वेळप्रसंगी रूग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. अशा वेळी उपचारांचा खर्च काही लाखांच्या घरात जाऊ शकतो. त्यामुळे स्वाईन फ्लू फक्त जीवघेणा ठरत नाही तर रूग्णाच्या कुटुंबावर प्रचंड आर्थिक बोजाही येऊ शकतो. स्वाईन फ्लूचं निदान उशीराने झाल्याने हा विकार गंभीर स्वरूप धारण करतो. यामुळे उपचारांची तीव्रता वाढते आणि खर्चही जास्त होतो. स्वाईन फ्लू पूर्णपणे बरा होईपर्यंत रूग्णाला रूग्णालयात ठेवलं जातं. स्वाईन फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून रूग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवावं लागतं. 

 
 
आधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर होतो. यामुळे खर्चाचा आकडा वाढू लागतो. हृदयविकार, किडनीविकार तसंच विविध प्रकारच्या कर्करोगांवरच्या उपचारांइतका खर्च आता स्वाईन फ्लूच्या रूग्णांवर केला जात आहे. अशी काही उदाहरणं समोर आली आहेत. स्वाईन फ्लूच्या उपचारांचा खर्च 15 ते 30 लाखांच्या घरात गेला आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांपैकी तीन ते सहा टक्के रूग्णांना विशेष उपचारांची गरज लागते. त्यात एक्स्ट्रा कॉप्रोरिअल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (इसीएमओ)चा समावेश असतो. या उपकरणाद्वारे रूग्णाच्या रक्तात ऑक्सिजन सोडला जातो आणि रक्तातला कार्बन डाय ऑक्साइड काढून टाकला जातो. फुफ्फुस निकामी झालं तर हे उपचार करावे लागतात. हे उपकरण बसवण्यासाठी अडीच ते तीन लाख रूपयांचा खर्च येतो.
 
अनेक रूग्णालयं ते भाड्याने घेतात. रूग्णाच्या दररोजच्या उपचारांचा खर्च 30 ते 50 हजार रूपयांच्या घरात जाऊ शकतो. अशी उदाहरणं दुर्मीळ असली तरी रूग्णांच्या कुटुंबाला याचा खूप मोठा आर्थिक़ फटका बसतो. त्यामुळे स्वाईन फ्लूबाबत अधिक जनजागृती होणं गरजेचं आहे. स्वाईन फ्लूविरोधी लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. इतकंच नाही, तर वेळीच स्वाईन फ्लूचं निदान होऊन तातडीने उपचार मिळणंही गरजेचं आहे. यामुळे हा विकार गंभीर स्वरूप धारण करणार नाही आणि भविष्यात होणारा खर्च टाळता येईल.