सोन्याचे अंडे देणारी कोंबडी!

    दिनांक :19-Jul-2019
श्रीनिवास वैद्य 
9881717838
 
‘गरिबी हटाव’ असा नारा इंदिराबाईंनी दिला होता. लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. इंदिराबाई निवडून आल्या. आता 2019 साल सुरू आहे. गरिबी अजूनही कायम आहे. राजकीय पक्ष मात्र या नार्‍यावर निवडून येत गेले. या नार्‍यावरून लोक राजकीय पक्षांवर टीकाही करत असतात. गरिबी हटली नाही म्हणून राजकीय पक्षांवर टीका करायची असेल, तर आम्हाला दररोज सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीची गोष्ट विसरावी लागेल. दररोज सोन्याचे अंडे घेण्यापेक्षा, कोंबडीच्या पोटातील सर्वच्या सर्व अंडी एकाच दिवशी प्राप्त करावी म्हणून कोंबडीचे पोट चिरणार्‍या त्या व्यक्तीला आपण अव्यवहारी म्हणून हिणवतो. त्या व्यक्तीला कोंबडीच्या ‘पोटातील’ सोन्याची अंडी तर मिळाली नाहीतच, उलट रोज सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच त्याने समाप्त केली. मग याच धर्तीवर, दर पाच वर्षांनी ‘गरिबी हटाव’चा नारा देत निवडून येणार्‍या राजकीय पक्षांनी गरिबी हटवली पाहिजे, असा आग्रह का धरायचा? ही गरिबी नावाची ‘कोंबडी’ चलाख राजकीय पक्ष का म्हणून समाप्त करतील? 

 
 
गरिबांना गरीबच ठेवायचे आणि नंतर विविध योजना, विविध सवलती देण्याच्या मिषाने त्यांना स्वत:च्या राजकीय पक्षाचे मिंधे करून ठेवायचे. राजकीय पक्षांची हमखास निवडणुका जिंकण्याची ही गुरुकिल्ली आहे. ती कुणी समुद्रात थोडीच फेकून देणार आहे. परंतु, मोदी सरकारची तशी इच्छा दिसत आहे. मोदी सरकारने या गरीब लोकांना बँकेत स्वत:चे खाते उघडायला लावले आणि नंतर जे काही त्यांना द्यायचे आहे, ते विविध दलालांमार्फत न देता, त्यांच्या खात्यात थेट रोखीने देणे सुरू केले. आता कुठे जायची गरज नाही, ना कुणा नेत्याच्या घरचे उंबरठे झिजविण्याची गरज! सशक्तीकरण म्हणतात ते हेच असेल काय? कुणी म्हणतील नरेंद्र मोदी वेडे आहेत. पण, याच वेडेपणामुळे लोकांनी त्यांना अधिक सशक्त करीत लागोपाठ दुसर्‍यांदा सत्तेवर बसविले आहे, हे विसरून चालणार नाही.
 
दुसर्‍या सत्तापर्वातील आपल्या योजनांचा पट उलगडणारे जे भाषण नरेंद्र मोदी यांनी केले किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी जो पहिला अर्थसंकल्प मांडला किंवा त्याआधी जे आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात आले, त्यावरून आता लक्षात येत आहे की, नरेंद्र मोदींना ‘गरिबी हटाव’ हा नकारात्मक संदेश देणारा नारा पसंत नाही. त्यांची दिशा ‘अमीर बनो’कडे आहे. लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याऐवजी, श्रीमंत बनवायचे. यात सकारात्मकता आहे. अंधार उपसत बसण्याऐवजी दिवा पेटविण्यासारखे आहे हे. ही सकारात्मकता भारतीय राजकारणात मोदींनी आणली आहे किंवा आणू बघत आहेत. आपल्या पहिल्या कार्यकाळातही त्यांना याच रेषेवरून चालायचे होते आणि त्यांनी तसा प्रयत्नही सुरू केला होता. परंतु, राहुलबाबाने मोदी सरकारला ‘सूट बूट की सरकार’ म्हणणे सुरू केले. मोदी सावध झाले आणि त्यांनी नाइलाजाने गरिबी हटावचा मार्ग धरला. त्यांच्या या दुसर्‍या सत्तापर्वात मात्र, राहुल गांधी केवळ पराभूतच झाले नाहीत, तर पुरते लोळागोळा झाले आहेत. आता मोदी ‘अमीर बनो’च्या मार्गावरून चालण्यास मोकळे झाले आहेत. तसे संकेत त्यांच्या एकूण बोलण्यातून आणि आचरणातून मिळत आहेत.
 
दरवर्षी आकडे जाहीर होतात की, इतके इतके लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यानंतर हे लोक जातात कुठे? दहावी उत्तीर्ण झालेला अकरावीत जातो, तसे गरिबीची रेषा पार केल्यावर हे लोक कुठे जात असतील? मला नेहमीच हा प्रश्न पडतो. मग लक्षात आले की, गरिबीची रेषा उल्लंघून ही सर्व मंडळी, आपल्या भारताच्या महान मध्यमवर्गात दाखल होतात. आपल्या भारतातला मध्यमवर्ग वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या गुणदोषांसह दिवसेंदिवस हा मध्यमवर्ग वाढत आहे. त्याच्याही आता तीन श्रेणी पडल्या आहेत. निम्म मध्यमवर्ग, मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग. परंतु, तुम्ही मध्यमवर्गाच्या कुठल्याही श्रेणीत असलात, तरी मध्यमवर्गाचे गुणधर्म प्रकटच करत असता. त्यातून सुटका नसते. अगदी कुणी उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत श्रेणीत दाखल झाला, तरीही त्याच्या आचार-विचारातून मध्यमवर्गीय गुणदोष प्रकट होतच राहतात.
 
अशा या एवंगुणविशेष मध्यमवर्गावर सार्‍या जगाची नजर आहे. जितका हा वर्ग वाढत जाईल, तितकी त्यांना जास्त प्रमाणात लाळ सुटत असते. कारण, या मध्यमवर्गाला जग एक बाजारपेठ मानते आणि म्हणून हा वर्ग जितका वाढत जाईल, ते जगाला हवेच आहे. मध्यमवर्ग म्हटला म्हणजे खर्च वाढतो. अनावश्यक गरजा आवश्यक गरजा होऊ लागतात. अर्थशास्त्री याला ‘क्रयशक्ती वाढणे’ असे गोंडस नाव देतात. परंतु, हा अनावश्यक खर्च (नंतर जो आवश्यक झाला असतो) इतका वाढतो की, मग एखाद्या जीवनावश्यक वस्तूची िंकमत नाममात्रही वाढली तरी तो अस्वस्थ होतो. वर्षाकाठी एक-दोनदाच रेल्वेने प्रवास करणारा, प्लॅटफॉर्म तिकीट दोन रुपयांनी महाग झाले की, आमचे बजेट बिघडले म्हणून ओरड करतो. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. म्हणजे उपचार कुठल्या रुग्णालयात घेतले, किराणा व भाजीदेखील कुठल्या दुकानातून घेतली, हादेखील त्याच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होत असतो. अशा या मध्यमवर्गाला भुलविण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेकानेक महाप्रचंड कंपन्या तयार बसलेल्या आहेत. त्यांना या मध्यमवर्गाला आपल्या नादी लावून, त्यांचा माल/वस्तू विकायच्या आहेत. त्यांची ही आशाळभूत धडपड, भारत सरकारवर, मध्यमवर्गाने अधिकाधिक खर्च करावा म्हणून दबाव आणत असते. ज्या दिवशी हा दबाव सरकार झुगारून देईल, त्याक्षणी भारतात खर्‍या अर्थाने एका अर्थक्रांतीची सुरवात झाली, असे म्हणता येईल.
 
मूळ भारतीय असून, परदेशात जाऊन तिथल्या कंपन्या किंवा संस्थांच्या गलेलठ्‌ठ पगारावर सुखासीन आयुष्य जगणारे अर्थशास्त्री, भारतीय जनतेला अधिकाधिक खर्च करण्यास भाग पाडणारी धोरणे सरकारने अवलंबिली पाहिजे, असा सल्ला देत असतात. उदारीकरण झाल्यापासून तर हे फारच वाढले आहे. भारतीय अर्थव्यवस्था केव्हा वर उचलली जाईल? तर, भारतीय जनतेची उपभोगक्षमता वाढेल तेव्हा. मग आकर्षक मॉल सजविले जातात. जाहिरातींचा भडिमार केला जातो. दिवसभर उन्हात राबणारी खेड्यातील तरुणी मग दुकानात जाऊन शरीर गोरे करणारी ‘फेअर अँड लव्हली’ची ट्युब विकत घेऊ लागते. कृषी पंपाचे थकित वीजबिल भरण्याऐवजी किंवा कृषी सेवा केंद्राची उधारी चुकती करण्याऐवजी, शेतकरी आपल्या मुलासाठी आधी मोटारसायकल खरेदी करू लागतो. आम्ही हे सुख केव्हा उपभोगायचे, असा प्रश्न तुमच्या तोंडावर फेकून तुम्हाला चूपही करू लागतो. याच्या मुळाशी ‘बचत करू नका, खर्च करा’ हा मूलमंत्र असतो.
 
अगदी शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास, भारताची अर्थव्यवस्था जी मुळात ‘बँक संचालित’ (बँक ड्रिव्हन) आहे, तिला ‘बाजार संचालित’ (मार्केट ड्रिव्हन) करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मग त्यासाठी भारतीयांना बचत खात्यातील कमी व्याजाचा दाखला देत निरुत्साहित करून, बाजारात पैसे गुंतविल्यानंतर मिळणार्‍या अधिक व्याजाचा लोभ दाखविला जात आहे. काही जण याला बळी पडतात. काही जण पडत नाहीत. परंपरेने चालत आलेली आपली भारतीय अर्थव्यवस्था ही कुटुंबाधारित असल्याने, लोकांचा कल बचत करण्याकडे असतो. त्यातही महिलांचा सर्वाधिक वाटा आहे. महिलांनी आपला हा गुण सोडता कामा नये.
 
मोदी सरकारची दिशा, लोकांना श्रीमंत बनविण्याची असली (आणि ती योग्यही आहे), तरी लोकांनी आपली ‘उपभोगक्षमता’ वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्याऐवजी, बचतक्षमता वाढवून स्वत: श्रीमंत होण्याचा मार्ग पत्करला पाहिजे, असे मला वाटते. हा मार्ग मळका, दूरवरचा आणि अनाकर्षक असला, तरी तोच भले करणारा आहे. आपली अर्थव्यवस्था कुटुंबाधारित आहे, हे आपले फार मोठे भांडवल आहे. जपान, जर्मनी तसेच दक्षिण आशियातील बहुतेक देशांचेही हेच भांडवल आहे. श्रीमंत बनण्याच्या नादात आपण ते गमविता कामा नये. श्रीमंत बनण्याच्या ईर्ष्येने हे भांडवल गमविणार्‍या देशांची काय स्थिती आहे, हे सर्वांसमोर आहेच.