भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती प्रक्रिया स्थगित!

    दिनांक :19-Jul-2019
सहकार मंत्र्यांचे आदेश
भंडारा, 
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भारतीला राज्याच्या सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. या संदर्भात 17 जुलै रोजी सुनावणी होऊन तसे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. नियमांना डावलून ही भरती होत असल्याने सुभाष आकरे यांनी या प्रक्रिये विरोधात बँक आणि सहकार आयुक्त पूणे यांच्या विरोधात थेट सहकारमंत्र्यांच्या दरबारी अपील केली होती. 

 
 
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 17 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. यासाठी दोन जाहिराती देण्यात आल्या. पहिल्या जाहिरातीत 16 व दूसऱ्या जाहिरातीत एका पदाचा समावेश होता. मात्र ही प्रक्रिया सन 2015-17 मध्ये नाबार्ड कडून सेवक भरती बाबद स्थापन करण्यात अलेल्या दि स्टेट लेव्हल टास्क फोर्स म्हणजेच एसएलटीएफ च्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करुन होत असल्याचा आरोप करीत सुभाष आकरे यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केली होती. या अपिलात भरती प्रक्रियेसाठी परवानगी देणारे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पूणे आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
 
सहकार आयुक्त पूणे यांनी 8 सप्टेंबर 2016 च्या पत्रानूसार सेवक आकृतीबंध व नोकर भरतीस बँकेला परवानगी दिली. मात्र परवानगी देताना सहकार आयुक्तांनी टास्क फोर्स मध्ये प्रस्ताविक असलेल्या प्रकरण 6 मधील सी.आर.ए.आर व एन.पी.ए. निकषांची पुर्तता बँकेकडून केली नसल्याची बाबच सहकार आयुक्तांनी लक्षात घेतली नसल्याचे अपिलकर्त्याचे म्हणणे आहे. तर नोकर भरतीसाठी जाहिरात देताना थेट मुलाखतीची जाहिरात देण्यात आली. त्यात उमेदवाराच्या लेखी परीक्षेचा उल्लेख कुठेही नव्हता. थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात आल्याने टास्क फोर्स मधील मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन येथेही करण्यात आली. त्यामुळे या भरती प्रक्रियेला स्थगीती देण्यात यावी, अशी मागणी अपिलकर्त्याने केली होती.
 
यावर सहकार मंत्र्यांकडे सुनावणी घेण्यात आली. यावेळी याचिकर्त्याने उपस्थितीत राहून आपले म्हणणे पटवून दिले. दरम्यान अपिलकर्त्याने नमूद केलेल्या मुद्यांमध्ये प्रथमदर्शनी सत्यता आढळून आल्याने अपिलकर्ते सुभाष आकरे यांच्या भरती प्रक्रियेवर स्थगिती देण्याची मागणी मान्य करण्यात आली. तसेच सहकार आयुक्त पूणे यांच्या 8 सप्टेंबर 2016 च्या पत्राला, आदेशाला, अमलबजाणीला तसेच बँकेने सुरु केलेल्या भरती प्रक्रियेला मुळ पुनरीक्षण अर्जावर सुनावणी होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 28 ऑगस्ट रोजी पूढील सुनावणी होणार आहे. नोकर भरती प्रक्रियेवर स्थगिती आल्याने आता अनेकांचा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान या संदर्भात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही तर प्रभारी मुख्य व्यवस्थापक रवींद्र गायकवाड यांनी परगावी असल्याचे सांगून या विषयावर प्रतिक्रीया देण्याचे टाळले.