या राज्यांमध्ये हृतिकचा ‘सुपर ३०’ टॅक्स फ्री

    दिनांक :19-Jul-2019
नुकताच अभिनेता हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ चित्रपट प्रदर्शित झाला. कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला बिहार सरकारने कर मुक्त म्हणून घोषीत केले होते. त्यानंतर आता राजस्थान सरकारने देखील या चित्रपटाला कर मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
‘सुपर ३०’ हा चित्रपट प्रेरणादायी आणि अद्वितीय इच्छाशक्तीचे एक चांगले उदाहरण आहे असे म्हणत राजस्थान सरकारने कर मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्या ट्विटद्वारे चित्रपट कर मुक्त केल्याचे सांगितले आहे.
 
‘सुपर ३० हा चित्रपट आनंद कुमार यांच्या खऱ्या आयु्ष्यावरील प्रेरणादायी चित्रपट आहे. हा चित्रपट अद्वितीय इच्छाशक्तीचे एक चांगले उदाहरण आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते. त्यानंतर ‘अशा चित्रपटांपासून आपल्याला प्रेरणा मिळते आणि समाजातील तरुणाईला शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्य रुजवण्यासाठी मदत होते. मी सुपर ३० चित्रपट राजस्थानमध्ये कर मुक्त केल्याचे घोषीत करतो’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
विकास बहल यांनी सुपर ३० चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी गणितज्ञ आनंद कुमार यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट आनंद कुमार यांनी गरीब मुलांना शिकवण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आणि मेहनतीची कथा आहे.