मुख्यामंत्र्यांनी सांगितले मुंबई तुंबण्याचे कारण...

    दिनांक :02-Jul-2019
मुंबई,
मुंबई शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडल्याने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही भागात भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडून मुंबईकरांचे जीव गेले. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन घेतला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील मालाड येथे झालेल्या दुर्घटनेत भिंत कोसळल्यामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती सभागृहाच्यावतीने शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. ही घटना गंभीरच आहे. काल रात्री झालेला पाऊस हादेखील अभूतपूर्व होता असे त्यांनी सांगितले.

तसेच मुंबईत साधारणपणे 4 ते 5 तासात 375 ते 400 मिमी पाऊस झाला. पावसाची गतकाळातील आकडेवारी पाहिली तर एवढ्या कमी वेळात एवढा पाऊस 1974 मध्ये पडला होता. त्यानंतर सगळ्यात जास्त पाऊस 2005 मध्ये. 40 वर्षांत कमी वेळेत इतका झालेला हा दुसराच पाऊस आहे. मुंबईतील जून महिन्याची पावसाची सरासरी यंदा केवळ 3 दिवसांत पावसाने गाठली. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईची पाणी निचरा क्षमता विचारात घेता, 24 तासात जेव्हा 150 मिमी पाऊस पडतो, तोवर ही क्षमता योग्य काम करते. मात्र अत्यंत कमी वेळात मोठा पाऊस होतो तेव्हा या व्यवस्थेवर ताण येतो. महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात भेट देऊन मुंबईची सर्व परिस्थिती जाणून घेतली. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही लावले असल्याने त्याद्वारे अनेक भागांचे लाईव्ह चित्र पाहिले. काही भागांमध्ये पावसामुळे पाणी तुंबले. ज्या भागांमध्ये पावसाचे पाणी साचण्याचा इतिहास आहे, अशा भागांमध्ये पावसाचे पाणी निचरा करण्याची व्यवस्था महापालिकेने उभी केली असल्याने पाण्याचा निचरा लवकर झाला असं त्यांनी सांगितले.
दरम्यान ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अंतर्गत मुंबईत 7 पंपिंग स्टेशन उभारायचे होते. समुद्रात उंच लाटा उसळतात तेव्हा पाऊस जोरात असेल तर पाण्याचा निचरा होत नाही. पाणी पातळी वाढून ते मोठ्या प्रमाणावर तुंबते. यावर उपाय म्हणून हे पंपिंग स्टेशन तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. समुद्राच्या जोरापेक्षा जास्त दाबाने पाणी बाहेर फेकण्यासाठी हे पंपिंग स्टेशन आहेत. या 7 पैकी 5 पंपिंग स्टेशन पूर्ण झाले आहेत. पंपिंग स्टेशनच्या उभारणीमध्ये जागा, विविध परवानग्या, सीआरझेड, न्यायालयीन प्रकरणं अशा अनेक अडचणी येतात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.