ICCWorldCup2019 : हिटमॅनचे विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक

    दिनांक :02-Jul-2019
बर्मिंगहॅम,
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना बर्मिंगहॅम येथे सुरू आहे. दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली.
दरम्यान, आजच्या सामन्यात रोहित शर्माने दमदार खेळी करत विश्वचषक स्पर्धेतील चौथे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 26 वे शतक साजरे केले आहे. रोहितने चेंडूत 100 धावा करत आपले शतक पूर्ण केले. सध्या रोहित शर्मा याला सौम्य सरकार याने बाद केले आहे. रोहित शर्माने 92 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 104 धावा केल्या. 
 
रोहित शर्माचे हे या विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक ठरले. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड या तीन संघांशी खेळताना रोहितने शतक झळकावले होते. त्यानंतर आता रोहितने बांगलादेशविरुद्ध शतक केले आहे. रोहितचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 26 वे शतक ठरले.
 
 
यापूर्वीच्या सामन्यात इंग्लंडविरूध्द रोहितने 25 वे शतक ठोकले होते. सर्वात जलद 25 शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. रोहितने 25 शतके ठोकण्यासाठी 206 डाव खेळले. या यादीत आफ्रिकेचा हाशिम आमला (151 डाव) अव्वल आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली (162) दुसऱ्या स्थानी आहे.