पेनॉल्टीची संधी गमावल्याने खेळाडूला धमकी

    दिनांक :02-Jul-2019
बोगोटा, 
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत चिलीविरुद्धच्या सामन्यात पेनॉल्टीची संधी गमावल्यामुळे कोलंबियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू विल्यम टेसिल्लो याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी मिळत आहे. गत आठवड्यात चिली विरुद्धच्या सामन्यात विल्यमने पेनॉल्टी शूटमध्ये संधी गमावल्याने कोलंबियाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत आपले आव्हान राखता आले नाही. तेव्हापासून सोशल मीडियावर विल्यमला धमकी मिळत आहे.
 
 
टेसिल्लोची पत्नी डॅनियला मिजिया इंस्टाग्रामवर आलेल्या धमकीचे स्क्रीन शॉट काढून ही माहिती दिली. आंद्रेस इस्कोबारसारखेच तुझे हाल करू, असे या धमकीपूर्ण संदेशात म्हटले आहे. 1994च्या विश्वचषकात आंद्रेसने आत्मघाती गोल नोंदविल्यानंतर कोलंबियाच्या आंद्रेसला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.
 
त्यांनी माझ्या पत्नीलासुद्धा धमकी दिली आहे, असे 29 वर्षीय डिफेंडर विल्यमने सांगितले. कोलंबियाचे पोलिस धमकी देणार्‍या व्यक्तीचा शोध घेत आहे, परंतु टेसिल्लोने अद्याप रितसर तक्रार नोंदविली नाही. असा धमकीपूर्ण पत्र लिहिणार्‍या व्यक्तीचे मनपरिवर्तन होण्यासाठी आमचा संपूर्ण कुटुंब ईश्वराकडे प्रार्थना करत आहे, असे विल्यम टेसिल्लोचे वडील म्हणाले.