भारताला नाटोसमान दर्जा; अमेरिकन सिनेटची मंजुरी

    दिनांक :02-Jul-2019
वॉशिंग्टन, 
नाटो राष्ट्रसमूहातील देशांना प्राप्त असलेला दर्जा भारताला देणार्‍या विधेयकाला अमेरिकन सिनेट सभागृहाने आज मंगळवारी मंजुरी दिली आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संरक्षण संबंध अधिकच मजबूत होणार असून, महत्त्वाच्या संरक्षण करारांमध्येही भारताला सूट मिळणार आहे. 

 
 
नॉर्थ ॲटलँटिक ट्रिटी ऑरगनायझेशन अर्थात्‌ नाटो ही संरक्षणाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या 29 देशांची संघटना आहे. सोव्हिएत युनियनला टक्कर देण्यासाठी अमेरिकेने 28 देशांच्या सहाय्याने ही संघटना स्थापन केली होती. नाटोमधील देशांना अमेरिका संरक्षण करारांमध्ये मोठी सूट देत असतेण तसेच या देशांचे अमेरिकेशी संरक्षण विषयक संबंधही चांगले आहेत.
 
भारताला अमेरिकेने आजपर्यंत नाटो देशांसारखा दर्जा दिला नव्हता. पुढील आर्थिक वर्षासाठी अमेरिकेने राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण कायदा पारित केला आहे. या कायद्यातच भारताला नाटो देशांसारखा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सेनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर या दोन सदस्यांनी हा प्रस्ताव सिनेट सभागृहात मांडला होता. पायरसी रोखणे, दहशतवादाला आळा घालणे, नौदल अधिक सक्षम करणे आणि भारत-अमेरिकेतील सागरी संबंध बळकट करण्यासाठी नाटो देशांसमान दर्जा भारताला देणे गरजेचे आहे, असे मत जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी व्यक्त केले.
 
या दर्जामुळे भारताला सवलतीच्या दरात अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेता येणार असून, नाटो संघटनेतील इतर देशांसोबत भारताचे संरक्षण संबंध आणखी दृढ होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. हा कायदा मंजूर करून घेतल्याबद्दल िंहदू अमेरिका फाऊंडेशनने जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांचे अभिनंदन केले आहे. भारताला नाटो देशांसमान दर्जा देण्याच्या या निर्णयाकडे भारत-अमेरिका संबंधांतील अभूतपूर्व पर्वाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे, असे मत िंहदू-अमेरिकन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक समीर कालरा यांनी व्यक्त केले.