बिचुकलेंचा जामिनासाठी अर्ज

    दिनांक :02-Jul-2019
सात वर्षांपूर्वीच्या खंडणी प्रकरणात बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आता बिचुकले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला आहे. गुन्हा जुना आहे, बिग बॉसच्या राऊंडमधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले पुन्हा फरार होईल व त्याचा परिणाम या केसवर होईल, असा निष्कर्ष नोंदवत सातारा न्यायालयाने हा जामीन फेटाळल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले.
 

 
 
बिग बॉस सिझन २ मधील अभिजित बिचुकलेला धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी २१ जून रोजी मुंबई येथून अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान, २०१२ मध्ये बिचुकलेवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यासाठी सातारा शहर पोलिसांनी बिचुकलेला अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बिचुकलेने सातारा न्यायालयात अर्ज केला होता. नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा पोलिसांची होणारी कारवाई टाळण्यासाठी बिचुकले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.