ॲटलांटा : किंग आणि गांधी

    दिनांक :02-Jul-2019
•जीवन तळेगावकर
9971699027
 
एक दिवस माझे मॅनेजर मला त्यांच्या टलांटातील घरी घेऊन गेले. ही घरं गोंडस दिसतात. ते म्हणाले की, सगळी घरे बाहेरून सारखी दिसावीत असा प्रशासनाचा दंडक आहे. त्यामुळे 4-5 प्रकारांव्यतिरिक्त फारसा चॉईस घरमालकाला देण्यात येत नाही. भारतीय मूल्यामध्ये माझ्या मॅनेजरचे प्रशस्त 2 मजली घर साधारण 1 करोड रुपयांचे असेल. मागे ते मुंबईला आले असता आम्ही परळ सारख्या गजबजलेल्या भागातून टॅक्सीने प्रवास करीत होतो, मध्ये कुठेतरी चाललेल्या हाऊिंसग प्रॉजेक्टवर चर्चा करताना जेव्हा मी त्यांना 3 बेडरुम फ्लॅट ची किंमत साधारण 1 करोड रुपये असेल असे सांगितले होते तेव्हा त्यांचा विश्वास बसत नव्हता. ते म्हणालेदेखील, अमेरिकेत निसर्गसान्निध्यात माझा प्रशस्त बंगला आहे त्याची किंमत एवढीच असावी... 

 
 
पुढे ते आम्हाला प्पालाचेन ट्रेलचे जगप्रसिद्ध गिर्यारोहण जिथून सुरू होते त्या टेकडीपर्यंत घेऊन गेले. माझा विश्वास बसेना, खाचखळग्यांचा रस्ता पार करत सिंहगडावर धावणारी माझी मोटारबाईक आठवत होती आणि इथे जाल तिथे गुळगुळीत रस्ते. अमेरिकेत जिथे हवे तिथे रस्ते बांधले आहेत; पण आजूबाजूची झाडी कापली नाही. अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारताना बरीच पर्यावरणात्मक तत्वं सांभळली आहेत. केवळ अवास्तव उपभोगवादापायी, चैनीपायी मोठमोठ्या एस.यू.व्ही., प्रचंड शीतके, कृत्रिम प्रकाशाची उधळपट्टी याद्वारे निसार्गावार अन्याय मात्र अव्याहत चालू आहे आणि हाच पर्यावरणाचा घात करतो आहे. आज अमेरिका दिसते, उद्या चीन होईल, भारतही होईल कदाचित पर्यावरणावर निरंकुश अन्याय करणार्‍या देशांच्या यादीत सामील. म्हणून आपण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसंदर्भात नियोजन करताना ‘पर्यार्थ व्यवस्था’ (इको-इकॉनॉमी- इकॉलॉजीकल इकॉनॉमी) कशी बांधता येईल या दृष्टीने विचार करायला हवा.
 
अमेरिकेतून ज्या दिवशी परतीच्या प्रवासासाठी निघायचे होते त्या सकाळी ‘कोकाकोला म्युझियम’ आणि ‘जॉर्जिया ॲक्वेरियम’ पाहायचे होते. जगाला भूरळ पाडणार्‍या पेयांमध्ये पेप्सी आणि कोकाकोला अग्रगण्य, या कोकाकोलाचे हेडक्वार्टर ॲटलांटालाच आहे. तिथे ते एक म्युझियमपण सांभाळतात. ज्यात पूर्ण कंपनीच्या प्रगतीचा आलेख अंतर्भूत होतो. इथे कोकाकोलाच्या वेगवेगळ्या पेयांची चवपण चाखायला मिळते. त्याच्या बाजूलाच ‘जॉर्जिया ॲक्वेरियम’ आहे. सुरेख सजावट, व्यवस्थित शास्त्रीय माहिती इ.नी युक्त हे सागररत्नमंडळ मला फार आवडले. लहानमुलांसाठी अशी ठिकाणं उत्तम शैक्षणिक केंद्रच ठरावित.
 
परतीच्या प्रवासात एक कॅनेडियन महिला भेटली. तिचा कॅनडात चश्मे विकण्याचा व्यवसाय आहे. म्हणाली, महिन्याकाठी साधारण 100 फ्रेम्स ‘डिव्हिएटेड’ म्हणून तिला नाकाराव्या लागतात, त्या फ्रेम्स चांगल्या असतात पण थोड्याशा म्यॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट मुळे तिथे विकल्या जात नाहीत. अशा फ्रेम्स ती भारतातील होतकरू एन.जी.ओ. ना भेट देऊ इच्छित होती. ती तिच्या लहानपणी स्कीईंग करण्यासाठी उत्तर कॅनडात जात असे तेव्हा 8-10 इंच जाडीचा अकृत्रिम बर्फ तयार होत असे आणि आज 20 वर्षांनंतर अनुभवते की तिथे स्कीइंग करण्यास उपयोगी बर्फ तयार होत नाही, म्हणून बर्फ़ाची कृत्रिम चादर अंथरावी लागते. निसार्गाचा किती र्‍हास होतो आहे, हे पटविण्यासंदर्भात वरील भाष्य मार्मिक ठरावे.
 
अमेरिकेत कुटुंबसंस्था बर्‍याच अंशी र्‍हास पावत आहेत. एक भारतीय वृद्ध मॅकडोनल्डमध्ये भेटले होते, म्हणाले- ‘40 वर्षांपासून इथे राहतोय, यहॉं सब लोग अकेले हैं’, तेव्हा पाश्चात्यांचे जे श्रेयस्कर तेवढेच घेण्याचा डोळसपणा आपण विकसनशील राष्ट्रांनी दाखवायला हवा. आपले जे सर्व चांगले आहे ते जपून ठेवायला हवे, वाढवायला हवे.