वृद्धेला लुटणारा गजाआड

    दिनांक :02-Jul-2019
शौक भागविण्यासाठी 'तो' महिलांना लुटायचा
 
नागपूर: दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या एका गर्दूल्यास प्रतापनगर पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातून १ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अनिल रमेश मंगलानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२४ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास एसई रेल्वे कॉलनी ले आऊट, प्रतापनगर येथे राहणाऱ्या माधुरी नारायण राजहंस या आपल्या कुटुंबियांसह वऱ्हाडी व्यंजन हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर रात्री ९.४५ च्या सुमारास त्या त्यांचे जावई पराग खटी यांच्यासोबत स्कूटी पेपने घरी जात होत्या. श्यामनगर झोपडपट्टी रोडने जात असताना मागाहून दुचाकीवर आलेल्या अनिलने राजहंस यांच्या गळ्यावर थाप मारून ७५ हजाराची सोनसाखळी लुटली आणि खामल्याकडे पळून गेला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तपासात ही जबरी चोरी अनिलने केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. २९ जून रोजी अनिल हा त्याच्या घरासमोर गांजा पित असताना पोलिसांच्या हाती लागला. पोलिस ठाण्यात आणून त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.अनिलला गर्द आणि गांजाचे व्यासन आहे. गर्द आणि गांजाची तलफ भागविण्यासाठी तो जबरी चोèया करायचा. राजहंस यांच्याशिवाय त्याने नशेच्या अंमलाखाली एका महिलेची देखील सोनसाखळी पळविली होती. परंतु, तो नशेत असल्याने नेमक्या कुठल्या भागात त्याने ही लुटमार केली हे तो सांगू शकला नाही. त्याच्या ताब्यातून पिटीव मन्यासारखी सोनसाखळी, सोन्याची लगड आणि दुचाकी असा १ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी त्याची तीन दिवसाची पोलिस कोठडी घेऊन त्याची कारागृहात रवानगी केली. ही कामगिरी पो. नि. सुनील शिंदे 
यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. मनोज जोशी, शिपाई चंद्रमणी सोमकुंवर, विद्याधर बक्षी, सिद्धार्थ खंडारे, प्रवीण फलके, धमेंद्र यादव, आनंद यादव, सतीश येसनकर आणि अतुल तलमले यांनी केली.