पुढील २-३ दिवस पावसाचा धोका, सतर्क राहा: मुख्यमंत्री

    दिनांक :02-Jul-2019
मुंबई,
गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील दोन-तीन दिवस मुंबईला पावसाचा धोका आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पावसाचा सामना करण्यासाठी सरकार आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी अॅलर्टवर आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या तीन-चार दिवसांत प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणी साचलं. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणचं साचलेलं पाणी उपसलं आहे. तर अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे. ते उपसण्याचे प्रयत्न महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत महिनाभराचा पाऊस पडला आहे. मुंबईतील परिस्थितीचा सामना करण्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. राज्य सरकार आणि महापालिका अधिकारी-कर्मचारी अॅलर्टवर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबईत मुसळधार पाऊस पडला असून, ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. हवामान विभागानंही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुढील दोन-तीन दिवस मुंबईला पावसाचा धोका आहे. त्यामुळं सतर्क राहा. नागरिकांनीही सतर्कता बाळगली पाहिजे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.