विमानात लपून जाताना 'तो' 3500 फुटांवरून पडला अन् झालं होत्याचं नव्हतं

    दिनांक :02-Jul-2019
लंडन,
केन्या एअरवेजच्या विमानानं प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा उंचावरून पडल्यानं मृत्यू झाला. विमान 3500 फूट उंचावरून उडत असतानाच ती व्यक्ती विमानातून थेट एका घराजवळच्या बगीच्यात जाऊन पडली. ही घटना पाहून बगीच्यात उपस्थित असलेले लोकही अचंबित झाले. ही व्यक्ती केन्या एअरवेजच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करत होती. बऱ्याचदा निर्वासित अशा प्रकारे लपून एखाद्या देशात जाण्याचा प्रवास करतात, पण तो त्यांच्या जीवावरही बेततो.
 
 
केन्या एअरवेजचं 787 विमान हिथ्रो एअरपोर्टवर लँडिंग करण्यासाठी खाली येत होते. त्याचदरम्यान ती व्यक्ती विमानातून थेट खाली कोसळली. विमानाचं लँडिंग झाल्यानंतर गिअर कम्पार्टमेंटमध्ये एक बॅग आणि खाण्यापिण्याचं काही सामान सापडलं आहे. ती व्यक्ती 3500 उंचावरून विमानातून कोसळून थेट एका बगीच्यात जाऊन पडली. त्यावेळी बगीचाचा मालकही तिथेच होता. तीन फूट दुरून त्यानं त्या व्यक्तीला पडताना पाहिलं आणि त्यालाही धक्काच बसला. तो मृतदेह माझ्यावर कोसळला नाही, त्यासाठी मी नशीबवान असल्याचंही त्या बगीचाच्या मालकानं वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
ती व्यक्ती एवढ्या जोरात कोसळली की लॉनमध्येही एक खड्डा झाला. तर दुसऱ्या एकानं सांगितलं की, मी घराच्या आत झोपलो होतो आणि जेव्हा जोरात आवाज आला तेव्हा डोळे उघडले. तेव्हा मी बाहेर येऊन पाहिलं तर एका मीटरच्या अंतरावर मृतदेह पडला होता आणि तो छिन्नविछिन्न अवस्थेत होता. ती दृश्य पाहून माझा थरकाप उडाला.