मुंबईत २६ जुलैची पुनरावृत्ती ?

    दिनांक :02-Jul-2019

मुंबई : २६ जुलै २००५ रोजी मुंबईत सर्वाधिक ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी १ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. सगळीकडे जलमय झालेला तो दिवस आठवला तर सहज अंगावर काटा येतो. सध्या मुंबईची परिस्थिती पाहता २६ जुलैच्या पुनरावृत्ती होणार का ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मुंबईत मागच्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पण सोमवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. २४ तासात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ३७५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ४४ वर्षात दुसऱ्यांदा २४ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

कुलाबा वेधशाळेमध्ये १३७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डहानूमध्ये १९२.८ मिमी ठाण्यामध्ये मागच्या २४ तासात २२०.४२मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी जुलै १९७४ मध्ये इतकीच ३७५.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी रात्री ११.३० वाजल्यापासून आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४१ मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे आज सकाळी मुंबईत अनेक भागात पाणी साचले होते. रेल्वे सेवाही ठप्प झाली होती. जुलै महिन्यात एकाच दिवसात गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस कोसळला. ठाण्यातील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे मागच्या २४ तासात एकूण ९४ तक्रारी आल्या. त्यात १३ झाडं कोसळल्याच्या आणि तीन फांद्या कोसळल्याच्या होत्या. ठाण्यात ४५ ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. असे असले तरी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडिक मुंबईत अशी कुठलीही परिस्थिती शहरात उद्भवली नसल्याचा दावा करत आहेत.