तब्बल १६ तासांनंतर मध्य मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु

    दिनांक :02-Jul-2019
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाल. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाल्याने लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पण अखेर १६ तासांनी मध्य मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. सीएसएमटी ते ठाणे मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे ठाणे ते सीएसएमटी सेवा पुर्णपणे ठप्प झाली होती.

 
 
ठाणे स्थानकावर तर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. काहीजण तर रात्रीपासून स्थानकांवर अडकून पडले होते. काही जणांनी रात्री स्थानकावरच मुक्काम करणं पसंत केलं होतं. मध्य रेल्वेसोबत हार्बर रेल्वेदेखील सुरु झाली आहे. मानखुर्द अप आणि डाऊन दोन्हीकडची वाहतूक पुर्ववत झाली आहे. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
 
 
पश्चिम रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, चर्चगेट ते विरार लोकलसेवा सुरु
पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी भरलं होतं. यामुळे चर्चगेट ते विरार लोकलसेवेला फटका बसला होता. पश्चिम रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र सध्या पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीत कोणताही अडथळा नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातील चारही ट्रॅकवरील पाण्याची पातळी खालावली असल्याचंही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.