धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत शिक्षिकेची हत्या

    दिनांक :02-Jul-2019
गोंदिया: शाळा सुरू असतानाच एका निर्दयी पतीने शिक्षिका पत्नीच्या शाळेत जाऊन इतर सहकारी शिक्षकांसमोरच आपल्या पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी ११ः३० वाजताच्या सुमारस गोंदिया तालुक्यातील ईर्रीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. विशेष म्हणजे हा थरार शाळेतील चिमूकल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखतच घडला. या घटनेने विद्यार्थ्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिभा दिलीप डोंगरे असे मृत शिक्षिकेचे नाव असून दिलीप डोंगरे असे आरोपीचे नाव आहे.
 
 
 
गोंदिया तालुका मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमिटर अंतरावरील ईर्रीटोला या गावात इयत्ता ५ पर्यंतची जिप वस्तीशाळा आहे. २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले. तर सोमवार १ जुलै पासून शाळा दुपारपाळीत भरत आहेत. दरम्यान, ईर्री येथीलच प्रतीभा डोंगरे नोकरीवर या शाळेत होत्या. मात्र, त्यांचा पती त्यांना नेहमी त्रास देत असल्याने त्या आपल्या दोन मुलींसह नजीकच्या दतोरा या गावात राहत होत्या. तर त्यांचा पती ईर्री येथेच राहायचा. मंगळवारी सकाळी मुख्याध्यापिका प्रतीभा डोंगरे दररोजप्रमाणे १०.३० वाजताच्या सुमारास शाळेत आल्या. प्रार्थना आटोपून ११.१५ च्या सुमारास कार्यालयात सहाय्यक शिक्षिका कुंभरे यांच्यासह कार्यालयात बसून होत्या. इतक्यात आरोपी दिलीप डोंगरे शाळेत आला. त्याने पत्नीला शिविगाळ करत सोबत आणलेली मिरची पूड प्रतीभा डोंगरे यांच्या डोळ्यात टाकली. प्रतीभा डोंगरे डोळे चोळत असतानाच त्याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने त्यांच्यावर सपासप वार केले. यात प्रतीभा डोंगरे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. हा थरार उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखतच घडल्याने आरडो-ओरड होऊन सर्वत्र धावपळ माजली. याचाच फायदा घेत आरोपीने पळ काढला. घटनेची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली. यावेळी ठाणेदार सुरेश नारनवरे यांनी घटनास्थळावर येवून पंचनामा केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे.