इतकं सोपं आहे लोकांना फसवणं?

    दिनांक :20-Jul-2019
चौफेर 
सुनील कुहीकर 
 
बदलत्या काळात नव्या पिढीने अनुसरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामस्वरूप एका युवकाने ऑनलाईन ऑर्डर नोंदवली. मोबाईल फोनची किंमत संबंधित कंपनीच्या अकाऊंटला अग्रीम जमा केली. मग काय, चार दिवसांनी एक पार्सल घरबसल्या त्याच्या हातात पडलं. त्याने मागणी केलेला मोबाईल फोन एव्हाना त्याच्या ताब्यात आलेला होता. पण, प्रत्यक्षात त्याचा उपयोग करण्यासाठी म्हणून हाताळणी सुरू झाली तर लक्षात आले की, आपण ज्याची मागणी केली, ते प्रॉडक्ट ‘हे’ नव्हेच! मग धावपळ सुरू झाली. संबंधितांशी संपर्क साधण्याची धडपड सुरू झाली. खरंतर, ऑर्डर नोंदवून पैसे जमा करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत कुठेच आडकाठी आलेली नव्हती. सारीच माणसं तोंडात साखर घोळल्यागत गोडगोड बोलत होती.
 
आता तक्रार नोंदवतानाचा अनुभव मात्र नेमका उलट होता. कुणीच धड बोलायला, माहिती द्यायला तयार नव्हता. एक ग्राहक म्हणून झालेल्या त्याच्या फसवणुकीसाठी कुणीच स्वत:ला जबाबदार मानायला तयार नव्हते. उलटपक्षी, फसवणूक बिसवणूक काही झालेली असल्याच्या आरोपावरच मुळात त्यांचा आक्षेप होता. गाठीशी आलेल्या या अनुभवाने, वस्तूची ऑर्डर नोंदवितानाचा त्या युवकाचा उत्साह आता पुरता मावळला होता. पैशाचा चुराडा तर झाला होताच, पण मनाजोगे उत्पादनही पदरी पडले नव्हते.
 
तसे या घटनेत आश्चर्य वाटण्याजोगे काही नव्हतेच. झाला प्रकार योग्य नसल्याची खात्री असतानाही त्याविरुद्ध पेटून उठणे वगैरे कुणाच्याच दृष्टीने फार आवश्यक नव्हते. कारण इथल्या ग्राहकांची, सर्वसामान्य जनतेची फसगत केली जाण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हता. असल्या फसवणुकीचे नवलही नव्हते कुणालाच! ‘त्यांनी’ फसवणूक करणे ही सर्वांच्याच दृष्टीने सामान्य आणि अपेक्षित बाब होती. सर्वांच्याच लेखी चूक ‘याची’च होती. यानेच काळजी घ्यायला हवी होती, असेच इतरांचे मत होते. आजवरचा इतिहास, कालपर्यंतचा अनुभव तरी हेच सांगत होता... 
 
 
वनस्पती तेलात गायीची चरबी, तिखटात लाकडाचा भुसा, चहापत्तीत घोड्याची लीद मिसळली जाण्याचे किस्से पाऽर जुने झाले आहेत एव्हाना. फळांमध्ये इंजेक्शन टोचून त्यांना रंग वा चव प्रदान करण्याचे, भाज्यांना विविध रंगांच्या आवरणातून सुशोभित करण्याचे प्रकारही आताशा सवयीचे झालेत लोकांच्या.
 
कुणीतरी कुणाचीतरी केलेली फसवणूक, लूट विस्मयाची बाब राहिलेली नाही आता. उलट, आता तर एखाद्याची इमानदारी हा बातमीचा विषय झाला आहे. रीक्षावाल्याने कुणाचेतरी लाखभर रुपये इमानदारीने परत करणे, ही बाब आश्चर्याची ठरू लागली आहे. त्याच्या हाती लागलेले पैसे परत न करता त्याने ठेवून घेतले असते, तर कुणालाच त्याचे काहीच वाटले नसते. या समाजाला सर्वांकडून अपेक्षा बेईमानीचीच आहे. म्हणून तर इमानदारी आश्चर्य अन्‌ चर्चेचा विषय ठरतेय्‌ इथे अलीकडे. निवडणुकीतली आश्वासनं फसवी असतात, निवडून आले की राजकारणी लोक जनतेच्या भावनांचा बाजार मांडत, स्वत:ची घरं भरतात, याततरी कुठे काय आक्षेपार्ह वाटते कुणाला? उलट, एखादा नेता वर्षानुवर्षे राजकारणात राहूनही सर्वसामान्य जीवन जगत असेल, तर ती बाब अविश्वसनीय ठरते इतरांसाठी. कारण, लोकांनाही राजकारण्यांकडून आपली लूट आणि फसगत होणेच अपेक्षित असते. म्हणूनच, त्या अपेक्षेविरुद्ध काही घडले की, तो अपवाद ठरतो.
 
दूरचित्रवाहिन्या किंवा वर्तमानपत्रातील जाहिरातींवर नजर टाका एकदा. टक्कल पडलेल्यांसाठी केसं उगवून देण्याचा दावा ठामपणे करणारी जाहिरात असो, की मग सुटलेली ढेरी कमी करण्यासाठीची, दरवेळी ग्राहकांची फसवणूक हमखास ठरलेली असते. पण, हजारो रुपये किमतीची उत्पादने ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयोग मात्र खात्रीने यशस्वी ठरतो. काळ्यांनाही गोरे करण्याची ठाम ग्वाही देणारी फेअर अँड लव्हलीची जाहिरात तर वर्षानुवर्षे चालली आहे. आडकाठी कुठेच नाही. जाहिरातही नाही अन्‌ फेअर अँड लव्हलीच्या विक्रीतही नाही. इतक्या वर्षात, ती क्रीम लावून कुणी गोरं झाल्याचे ऐकले आहे कुणी कधी? पण, त्या उत्पादनाबाबत केल्या जाणार्‍या फसव्या दाव्यांवर तीव्रतेने आक्षेप नोंदविले जात असल्याची वार्ता मात्र कानी नाही. सिगारेटींची पाकिटं अन्‌ त्यावरचा धोक्याचा इशारा तर फसवेगिरीचा कळस आहे. लोकांच्या खिशातून पैसे काढून त्याला त्याचाच मृत्यू विकण्याची पद्धत झिडकारावीशीही वाटत नाही कुणालाच इथे.
 
असे का घडत असेल? आपलेच लोक आपल्याच समाजातील, आपल्याच देशातील लोकांची फसवणूक करायला का धजावत असतील? ज्या गोष्टींसाठी पैसा मोजलेला असतो ग्राहकाने, त्या पैशाच्या बदल्यात त्या किमतीची, त्या दर्जाची, त्याच्या हक्काची वस्तू का मिळत नाही त्याला? भारतीय जनतेची लूट करायलाच का टपलेला असतो प्रत्येक जण? मुंबईसारख्या शहरात फूटपाथवर चाळीस रुपयांत पोटभर जेऊ घालणारी व्यवस्थाही अस्तित्वात आहे अन्‌ ताज, ट्रिडेंटसारख्या स्टार हॉटेल्समध्ये पोटभर जेवायला चार हजार रुपये मोजावे लागतील अशी व्यवस्थाही आहे. लोक आपापल्या परीने स्वत:चे पर्याय निवडतात. फूटपाथवर चाळीस रुपये मोजून थाळी ऑर्डर करणारा माणूस अपेक्षाही त्याने मोजलेल्या पैशानुसारच करतो. अडचण तर तेव्हा निर्माण होते, जेव्हा समोरच्या माणसाने सांगितलेली किंमत मोजूनही शेवटी फसगतच ग्राहकाच्या वाट्याला येते. बड्या कंपन्यांच्या प्रसिद्धी पावलेल्या उत्पादनांची हुबेहूब कॉपी करून, नावात जाणीवपूर्वक साधर्म्य ठेवून व्यापारपेठेत त्या आणण्याचा अक्कलहुशारीने केलेला प्रकार नेमका कशासाठी असतो? कुणाची फसवणूक करायची असते त्यांना यातून?
 
राजकारण्यांपासून तर व्यापार्‍यांपर्यंत अन्‌ उद्योजकांपासून तर शिकवणी वर्गांचा बाजार मांडून बसलेल्यांपर्यंत सर्वांनाच, या देशातील सर्वसामान्य माणसाची फसवणूक करणे फार सोपे असल्याचा भास एकसाथ का व्हावा? एकीकडे दारूविक्रीतून अमाप कर मिळवून देणारा अबकारी विभागही तयार करायचा अन्‌ दुसरीकडे दारूबंदी अंमलात आणण्यासाठी धडपडणारा विभाग केविलवाण्या परिस्थितीत चाचपडत राहील अशी व्यवस्थाही निर्माण करायची, ही सरकारी तर्‍हा नेमकी कशासाठी अस्तित्वात आली असेल? कोकाकोलासारखी एक कंपनी कोकाकोला, स्प्राईट, फॅण्टा, डाएट कोक अशा कितीतरी वस्तू निर्माण करते. वेगवेगळी स्पर्धक उत्पादने असल्यागत त्याची मांडणी लोकांसमोर करते अन्‌ खोर्‍याने ओढून एकाच गल्ल्यात पैसे जमा करते. आहे ना गंमत! लेजचे आलू चिप्स अन्‌ ट्रॉपिकानाचे फ्रुट ज्यूस एकाच पेप्सी कंपनीची उत्पादने असल्याचे तरी कुठे ठाऊक असेल फार लोकांना? पण, आपल्याच खिशातून पैसा काढून आपल्याच डोक्यावर मिरे वाटताहेत त्या विदेशी कंपन्या. जेव्हा कॅडबरी चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्याने गदारोळ झाला तेव्हा त्यांनी, लोकांची समजूत काढायला अमिताभ उभा केला सर्वांसमोर. अळ्या सापडल्या म्हणून अकांडतांडव करणारी सर्वसामान्य जनता, एक बच्चन समोर उभे राहिल्याबरोबर सुतासारखी सरळ झाली. त्या कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या नसल्याची ग्वाही बच्चनसाहेबांनी त्या कंपनीकडून लक्षावधी रुपये घेऊन द्यावी अन्‌ भोळ्या-भाबड्या जनतेने बच्चनसाहेबांवर विश्वास ठेवून कॅडबरीची खरेदी पुन्हा सुरू करावी...
 
किती सोप्पं आहे ना इथल्या नागरिकांना मूर्ख बनवणं! अमिताभ बच्चन यांनी कॅडबरीच्या वतीने खात्री का द्यावी, असा सवालही कुणी विचारला नाही, की त्यावर आक्षेपही नोंदवला नाही कुणी. मॅगीनेही तेच केलं. आणिबाणी लादल्याने निर्माण झालेला जनमनातला रोष घालवण्यासाठी इंदिरा गांधींना तरी माफीनाम्याशिवाय दुसरं काय दिव्य करावं लागलं होतं सांगा? आणिबाणी विसरून सोपवली की लोकांनी पुन्हा त्यांच्याच हातात सत्ता! बहुधा हेच साधेभोळेपण आड येत असेल. म्हणूनच भारतीय जनसमूह फसवणूक करण्यास अतिशय ‘योग्य’ असा घटक असल्याची खात्री सर्वांनाच पटली असेल. त्यामुळेच की काय, पण जो उठतो तो डोक्यावर टपली मारून निघून जातो. कधी माध्यम राजकारणाचे असते, तर कधी क्रिकेटच्या खेळाचे. इतकेच कशाला, अगदी दहशतवादी कृत्याचे जरी उदाहरण घेतले, तरी लूट जनतेची होत असल्याचेच स्पष्ट होईल!
9881717833