का झाली राधा-कृष्णाची ताटातूट?

    दिनांक :20-Jul-2019
राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची उदाहरणं दिली जातात. मंदिरांमध्ये राधा-कृष्णाची मूर्ती आढळते. कृष्णासोबत राधेचं नाव जोडलं जातं. कृष्ण राधेचा सखा पण कृष्णाने राधेशी विवाह केला नाही. एवढं प्रेम असूनही त्याने राधेला दूर ठेवलं. कृष्ण म्हणजे साक्षात परमेेश्वर. पण आपल्या प्रेयसीशी त्याचं मिलन झालंच नाही. कृष्णाने राधेशी विवाह का केला नाही, याचं कुतुहल भक्तांना वाटत आलंय. यामागे काही कारणं आहेत. त्याविषयी जाणून घेऊ... 

 
 
श्रीकृष्णाला बांधून ठेवलेलं असताना त्याची आणि राधेची पहिली भेट झाली. या प्रसंगाबाबत श्रीकृष्णाने माता यशोदेला सांगितलं. तो म्हणतो, एक मुलगी माझ्याजवळ आली. तिने माझ्याकडे पाहिलं. तेव्हापासून मीच तिच्या जीवनाचा आधार बनून गेलोय. आपण राधेशी लग्न करणार असल्याचं श्रीकृष्णाने यशोदेला सांगितलं. पण यशोदेला हे मान्य नसतं. ‘राधा तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. ती साधी गवळण आहे. त्यातच तिचा साखरपुडा दुसर्‍या मुलाशी झालाय. त्यामुळे ती तुझ्यासाठी योग्य नाही’, असं यशोदा त्याला सांगते.
 
राधेशी लग्न करण्याच्या कृष्णाच्या हट्टाबाबत नंदाला कळल्यानंतर त्याने श्रीकृष्णाला गुरू गर्गाचार्‍यांकडे नेलं. त्यावेळी ‘तुझ्या आयुष्याचा मूळ उद्देश वेगळा आहे’ असं गुरूंनी श्रीकृष्णाला सांगितलं. तू मुक्तीदाता आहेस, या संसाराचा तारणहार आहेस. भक्तांना त्यांच्या संकटातून मुक्त करण्याची मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे, या शब्दात गुरूंनी कृष्णाला समजावलं. या कारणांमुळे श्रीकृष्ण आणि राधा यांचा विवाह होऊ शकला नाही पण राधा आणि कृष्ण यांचं नाव एकमेकांशी जोडलं गेलं ते कायमच.