वरोडा शहरात मोठ्याप्रमाणात प्लास्टिक साठा जप्त

    दिनांक :20-Jul-2019
वरोडा,   
शहरात महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड चंद्रपूर आणि वरोडा नगर परिषदेच्या संयुक्त कारवाईत तब्बल 2 टन प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे, मात्र वरोडा शहरात किरकोळ दुकानदार ते मोठ्या या व्याप्याऱ्य पर्यंत सर्वच जण सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करतात. विशेष म्हणजे बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर शहरात मोठ्या प्रमाणात दिसतो. नगर परिषद अधून मधून कारवाई करीत असली तरी दुकानदार याला जुमानत नसल्याचे दिसत आहे. शुक्रवारला केलेल्या संयुक्त कारवाईत शहरातील व्यापारी अतुल गोठी यांच्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळताच शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास धाड टाकण्यात आली या कारवाईत अधिकाऱ्यांनी तब्बल 2 टन प्लास्टिक जप्त केले आणि गोदाम मालकावर 10000 रुपयाचा दंड ठोठावला. सदर कारवाई न प चे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांचे मार्गदर्शनात स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर, उमेश ब्राम्हणे यांनी केली त्यामुळे प्लास्टिक विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.