रात्र होताच बसस्थानक बनते दारुड्यांचा अड्डा

    दिनांक :20-Jul-2019
बसस्थानकाच्या जलकुंभ परिसरात दारुच्या बाटल्या!
रात्रीच्या वेळी भरतो, दारुड्यांचा अड्डा
भंडारा,
एखाद्या गोष्टीचा कोण कधी कसा उपयोग करेल, याचा नेमच राहिलेला नाही! आता हेच बघा ना...बस स्थानकावर प्रवाशांची तृष्णा भागविण्यासाठी एका स्वयंसेवी वृत्तीच्या व्यक्तिमत्वाकडून शीतल जलकुंभ उभारण्यात आले आहे. दिवसभर या ठिकाणचे पाणी पिऊन प्रवाशी तृप्त होतात. मात्र येथे रात्री चक्क दारुड्यांचा अडड भरतो. 20 रुपये खर्चुन थंड पाण्याची बॉटल आणून व्यसन पुर्ण करण्याची ऐपत नसलेले अनेक जण जलकुंभातील थंड पाण्याच्या मदतीने गरज भागवितात. ऐवढेच नाही तर रिकाम्या झालेल्या दारुच्या बाटल्याही तेथेच फेकल्या जातात. आता हा प्रकार रोजचा झाला असल्याने बरेचदा दारुड्यांचा भरलेला अड्डाही नरजेस पडतो.
 
 
इच्छा तिथे मार्ग, हे खरेच आहे. पिणा-यांच्या प्रचंड इच्छेपूढे त्यांना मार्ग सापडतो आणि जलकुंभातील थंड पाणी त्यांची गरज भागविते. भंडारा बस स्थानक परिसरात भव्य असे जलकूंभ आहे. सेवाभावी वृत्तीच्या एका इसमाने त्याच्या आप्तजनांच्या स्मृती निमित्त ते दान केले आहे. मात्र त्याचा अशा पद्धतीने उपयोग होत असेल तर त्याच्या दातृत्वाची हीच काय किंमत हाही प्रश्न पूढे येते. बस स्थानकाच्या अखत्यारित असल्याने जलकुंभाच्या सुरक्षेचा विषयही बस स्थानक व्यवस्थापनाचा आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक या परिसरात असतो. मगं अशावेळी व्यसनी लोकं दारुचा अड्डा कसा भरवू शकतात, हा प्रश्नच आहे. अनेकदा नाईलाजास्त प्रवाशांना बस स्थानकावरच रात्री काढावी लागते. अशा ऐकट्या दूकटया प्रवाशांनाही या दारुड्यांच्या त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री दारुसाठी या जलकुुंभाचा वापर झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या दारुच्या बाटल्या याच जलकुंभाच्या परिसरात फेकून ठेवलेल्या असतात. त्यामुळे सकाळी येणा-या प्रवाशांना याचाही मनस्ताप सहन करावा लागतो.
बस स्थानक व्यवस्थापनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. नाहीतर भविष्यात ही बाब गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.