मोक्कातील आरोपीचे रुग्णालयातून पलायन

    दिनांक :20-Jul-2019
नागपूर,
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती असलेल्या मोक्काच्या एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सिजो एल. आर. चंद्रन असे या आरोपीचे नाव आहे.
सिजो चंद्रन हा मुळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याच्यावर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, नागपूरसह अनेक शहरात गुन्हे दाखल आहेत. काही वर्षापूर्वी त्याने वाडी हद्दीतून एकाचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. डिसेंबर २०१८ मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती.
 
 
पोलिस तपास झाल्यानंतर पोलिसांनी ११ डिसेंबर २०१८ रोजी त्याला मध्यवर्ती कारागृहात डांबले होते. त्याला मधुमेह, क्षयरोग, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा आजार आहे. ४ जुलै रोजी हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने कारागृह प्रशासनाने त्याला सुपर स्पेशालिटीमध्ये भरती केले होते. वार्ड क्र. ४३ येथे त्याला भरती करण्यात आले होते. त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी शुक्रवारी रात्री आरोपी सेलचे शिपाई राजेंद्र ठवरे आणि कमलेश या शिपायांची नेमणूक करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सिजो हा शौचासाठी शौचालयात गेला. त्यावेळी दोन्ही शिपाई शौचालयासमोरच होते. सिजोने दोन्ही शिपायांची नजर चुकवून शौचालयातून पळ काढला. त्यानंतर दुसरा रूग्ण शौचालयात गेला. अर्धा तास झाला तरी सिजो बाहेर न आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दार ठोठावले असता आतून सिजोऐवजी भलताच इसम बाहेर आला. भलत्याच इसमाला पाहून पोलिस अवाक झाले. पोलिसांनी त्या इसमाला विचारणा केली असता त्याने काहीच माहिती दिली. दोन्ही शिपायांनी इकडेतिकडे शोध घेऊनही आरोपी न सापडल्याने शेवटी शहर नियंत्रण कक्षाला ही माहिती देण्यात आली. पळून जाताना सिजोने त्याच्या उपचाराची फाईल आणि डिस्चार्ज कार्ड सोबत नेल्याची माहिती आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिजो इतक्या आजारांनी ग्रस्त आहे की, त्याला धड चालता सुद्धा येत नाही. जास्तीत जास्त अर्धा किमी चालला की, त्याला थकवा येतो. त्याचप्रमाणे मागील चार दिवसांपासून तो डिस्चार्ज करण्यासाठी पोलिसांना विनवणी करीत होता अशीही माहिती आहे. त्याला पकडण्यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे पथके लावण्यात आली आहेत. मात्र, वृत्त लिहीपर्यंत तो पोलिसांच्या हाती सापडला नव्हता. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.