अक्षयकुमारच्या 'मिशन मंगल'मध्ये मोदी

    दिनांक :20-Jul-2019
नवी दिल्ली,
अक्षय कुमारची भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र अक्षयकुमारने याबाबत अळीमिळी गुपचिळी बाळगली आहे.
 
 
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या बहुप्रतिक्षित 'मिशन मंगल' सिनेमाचा ट्रेलर काल लाँच झाला. इस्रोच्या वैज्ञानिकांच्या 'मिशन मंगल' या मंगळ ग्रहावर अवकाशयान पाठवण्याच्या प्रयत्न आणि जिद्दीवर हा सिनेमा आहे.
मिशन मंगल सिनेमाच्या अखेरीस नरेंद्र मोदी झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. 'तुम्ही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. जेव्हा येणार असतील, तेव्हा मी स्वतःच तुम्हाला सांगेन.' असं उत्तर अक्षयकुमारने दिलं. वैज्ञानिक राकेश धवन आणि तारा शिंदे यांच्या प्रयत्नांवर प्रामुख्याने या सिनेमाचं कथानक आधारित आहे. या वैज्ञानिकांनी मंगळावर सॅटेलाईट पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
'इस्रो'च्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होणार, त्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इस्रो'ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली होती. योगायोगाने याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचं अक्षयने सांगितलं. "बिना एक्सपरिमेंट के कोई सायन्स नही है, एक्सपरिमेंट नहीं करेंगे तो हमें अपने आपको सायंटिस्ट कहने का कोई हक नहीं, अक्षयच्या अशा दमदार डायलॉगने सिनेमाच्या ट्रेलरला सुरुवात होते.