‘लबाड’ राजाची गोष्ट

    दिनांक :21-Jul-2019
मिलिंद महाजन
7276377318
 
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्डस्‌वर रविवारी यजमान इंग्लंड क्रिकेटचा राजा ठरला, नव्हे ठरविण्यात आला. दोन चौकारांमुळे इंग्लंडला क्रिकेटचा चौकट राजा घोषित करण्यात आला. प्रत्येकी 50 षटकांचा सामना नाट्यमयरीतीने टाय झाला, नंतर सुपर ओव्हरमध्येसुद्धा लुटापुटीच्या खेळासारखा हा सामना टाय ठरविण्यात आला. मग काय तर नियमानुसार सुपर ओव्हरमध्ये दोन चौकार हाणल्यामुळे इंग्लंड विजेता. हा सारा प्रकार रूपेरी पडद्यावर घडणार्‍या घटनाक्रमाप्रमाणे एकापाठोपाठ घडत गेला आणि हं चला चला... सुपर ओव्हरमधील चौकारांच्या नियमानुसार इंग्लंड विजेता बनला. 

 
 
खरे तर बाराव्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता कोण?, याकडे गतरविवारी समस्त क्रिकेटजगताचे लक्ष लागून होते. दोन्ही संघांनी प्राण पणाला लावून जोरदार संघर्ष केला. आव्हान उभे करताना न्यूझीलंडला काही प्रमुख खेळाडू बाद झाल्याने हादरे बसले, परंतु पुढे न डगमगता इंग्लंडच्या गोलंदाजाचा सामना करत त्यांनी 241 धावांपर्यंत मजल मारलीच. तिथे धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या तोंडाला फेस आला होता. बेन स्टोक्सने एकाकी किल्ला लढविला, परंतु त्याचीही ताकद कमी पडत असल्याचे यजमानांना लक्षात आले. म्हणून आता काही तरी करा आणि इंग्लंडला जिंकावा असा काहीसा चंग यजमानांनी बांधला आणि पुढील खटाटोपामुळे सामन्याला वेगळीच कलाटणी मिळत गेली. म्हणूनच की काय ओव्हर थ्रोनिमित्ताने इंग्लंडला सहा धावांचे दान नव्हे जीवदानच दिले. तरीही इंग्लंडला जिंकता आले नाही अन्यथा तेव्हा न्यूझीलंड विजेता ठरला असता, मात्र तरीही इंग्लंडने कसाबसा सामना बरोबरीत राखला.
 
वास्तविक क्रिकेटच्या जागातिक व्यासपीठावर न्याय देणारे पंच कसे तरबेज असायला हवे. मैदानावरील पंच असो अथवा बंद खोलीत स्क्रीनसमोर बसून असलेले तिसरे, चौथे पंत असो त्यांनी कुठल्याही दडपणाला न जुमानता सद्विवेक बुद्धीचा वापर निष्पक्ष व योग्य न्याय द्यायला पाहिजे. ओव्हरथ्रोवर सहा ऐवजी पाच धावाच द्यायला पाहिजे होत्या, असा आवाज आंतरराष्ट्रीयस्तरावर नावाजलेले निवृत्त पंच व क्रिकेट नियमांसंदर्भातील अभ्यास गटाचे सदस्य असणार्‍या सायमन टॉफेल यांनी उठविला. सहा धावांचा पंचाचा निर्णय चुकीचा होता, असे ठाम मत त्यांनी मांडले. ओव्हरथ्रो करतेवेळी दोन खेळाडू एकमेकांना क्रॉस झाले नव्हते, त्यामुळे इंग्लंडला पाच धावा द्यायच्या असत्या. त्यांना तेव्हाच पाच धावा दिल्या असत्या तर न्यूझीलंडच विश्वविजेता ठरला असता. सुपर ओव्हरमध्येही न्यूझीलंडला कमनशिबी ठरविण्यात आले. इंग्लंडने दोन चौकारांसह 15 धावा केल्या होत्या. विजयासाठी 16 धावा काढताना न्यूझीलंडला एका षट्‌कारसह 15 धावाच काढता आल्या. यातही न्यूझीलंडने तोडीस तोड प्रत्युत्तरात 15 धावा काढून सामना बरोबरीत राखला, परंतु नियमानुसार दोन चौकारांमुळे पंचांनी इंग्लंडला विजेता घोषित केले.
 
वास्तविक अखेरच्या क्षणापर्यंत तोडीस तोड चिवट झुंज देणार्‍या इंग्लंड आणि न्यूझीलंडला आयसीसीने संयुक्तपणे विश्वविजेता जाहीर करायला काहीच हरकत नव्हती. पंचांच्या निर्णयावर चौफेर टीका होत असताना आयसीसी मात्र एका वाक्यात स्पष्टीकरण देऊन मोकळा झाले आणि क्रिकेटच्या धर्माचे पालन न करणार्‍या पंच कुमार धर्मसेना यांना अभय दिले.
 
मर्यादित 50 षटकांचा खेळ व सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला होता. पण, सर्वाधिक दोन चौकारांच्या नियमामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. ह्या चौकारांच्या नियमावरही अनेक क्रिकेटपटू व तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियमात बदल करण्याची गरज आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला, तेव्हाही त्यांनी गुणतालिकेतील सरासरी धावगतीच्या नियमात बदल व्हावा अशी मागणी केली होती. अन्यथा अशा लुटापुटीच्या लढतीत कोणताही लबाड संघ क्रिकेटचा राजा होतो, अशी समज होईल.