मानवी इतिहासांतील अपूर्व क्षण

    दिनांक :21-Jul-2019
50 वर्षांपूर्वी 22 जुलै 1969 रोजी प्रकाशित तरुण भारतचा अग्रलेख
 
अनादिकालापासून भूतलावरील मानव ज्या चंद्राकडे आशेने पाहात होता, ज्याच्याबद्दल असंख्य कविकल्पना नित्य प्रस्फुरित होत होत्या, ज्याची वर्णने पुराणांतून आपण वाचत होतो, त्याच चंद्रलोकावर दोघा मानवांनी पाऊल ठेवल्याची व त्या अपरिचित भूमीवर अल्पकाळ वास्तव्य आणि वाटचाल केल्याची रोमहर्षक, चित्तथरारक घटना म्हणजे मानवाच्या विज्ञाननिष्ठेचा अत्यंत सुंदर आविष्कार होय. अनंतकाळापूर्वीपासून पृथ्वीच्या हृदयाचा जो हा भाग दूर अंतराळात एकाकी भ्रमण करीत होता, त्याचे एकाकीपण आता संपले आहे. त्याच्याशी धरित्रीचा संपर्क साधला गेला आहे. अवकाश-युग सुरू होऊन एक तप उलटते न उलटते, तोच मानवाने हा अभूतपूर्व विक्रम दाखविला आहे.
 
युगायुगांत असा अद्भुत प्रवास कोणी कधी केला नसेल. चंद्रलोकावर पदार्पण करण्यासाठी दुसरी रोमांचकारी घटना आजवर घडली नसेल. अनंत अवकाशाचे आव्हान फार मोठे आहे, जबरदस्त आहे, त्याची जाणीव मानवी मनाला असूनही, चंद्रलोकावर जाण्याच्या धाडसाला तो प्रवृत्त झाला. अवकाशातील असंख्य लहानमोठे ग्रह, लक्षावधी सूर्यमाला आणि अगणित तारे हे सगळे लक्षात घेता, पूर्ण अवकाश जिंकता येणे ही अवघड गोष्ट असल्याचे माहिती असूनही, साहसी मानव एकेका ग्रहाला कवेत घेण्याचा प्रयत्न करू लागला, चंद्र, मंगळ, शुक्राचे संशोधन त्याने चालविले. त्यांपैकी चंद्रलोकावर मानवाने आज विजय मिळविला असल्याने, त्याच्या कर्तृत्वाच्या परमोच्च आविष्काराच्या या समयी सारा भूलोक आनंदित झाला आहे. या साहसामुळे लक्षलक्ष मानवी मनात हर्षाच्या, अभिमानाच्या आणि त्याबरोबरच अद्भुताच्या ज्या भावना उचंबळून येत आहेत, त्यांना तर मर्यादाच राहिलेल्या नाहीत. 

 
 
1970 पूर्वी चंद्रलोकावर जाण्याचा जो विश्वास अमेरिकेचे दिवंगत राष्ट्रपती केनेडी यांनी व्यक्त केला होता, तो विश्वास किती सार्थ होता, याची प्रतिती आज सार्‍या जगाला आलेली आहे. नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रीन यांनी आपल्या चर्मचक्षूंनी चंद्रलोकाचे दर्शन घेतले, ही घटना जितकी चित्तथरारक तितकीच अभिमानास्पदही आहे. या यशात अमेरिकेचा वाटा सर्वात मोठा आहे. तरीपण हे यश सर्व मानवजातीचे आहे, असे मानावयाला हवे. कारण आज विज्ञानाच्या नव्या इतिहासाचे पर्व सुरू झालेले आहे; संशोधनासाठी एक नवीन द्वार खुले झाले आहे. कित्येक दिवस उराशी बाळगलेले एक भव्यदिव्य स्वप्न साकार झाले आहे. त्या दृष्टीने या अमेरिकन चंद्रवीरांचे जेवढे कौतुक करावे, जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडेच होणार आहे. त्यांनी प्रत्यक्ष चंद्रलोक तर बघितलाच, त्यावर प्रथम पाऊल टाकून तेथील माती आणि दगड तर संशोधनासाठी आणलेच, शिवाय सबंध जगही एकदम- एका दृष्टिक्षेपात पाहण्याचे भाग्यही त्यांना लाभू शकले.
 
अज्ञाताविषयी मानवाला नेहमीच उत्सुकता वाटत आलेली आहे. आपल्या नजरेच्या कप्प्यापलीकडे काय घडते आहे, हे जाणून घेण्यासाठी तर तो नित्य धडपडत असतो. या धडपडीच्या कक्षा विस्तारत जाऊन अखेर तो चंद्राकडे प्रथम आकर्षिला गेला व त्याने पाहता पाहता त्यावर विजयही मिळविला. चंद्रलोकावर वस्ती आहे काय? पाणी आहे काय? जमिनीत पिके निघू शकतात काय? असे असंख्य प्रश्न या चंद्रस्वारीमुळे निर्माण झालेले असले, त्याबद्दलचे कुतूहल अधिकच वाढले असले, तरी कालांतराने याही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील व चंद्रलोक आणि पृथ्वीलोक यांच्यात अधिक जवळीक निर्माण होईल, हे मात्र सत्य आहे.
 
अवकाशाचा भेद करून आणि अनंत अवकाशाच्या पोकळीतून गेल्या बुधवारपासून जे अपोलो-11 यान भ्रमण करीत आहे, त्याने आपले ईप्सित बव्हंशी साध्य केले असून, मानवासाठी संशोधनाची अनेक दालने आता खुली करून ठेवली आहेत. या अपोलो-11 ची संचालनयंत्रणा किती पद्धतशीर, किती अचूक आहे, हे पाहून तर कोणीही थक्क झाल्याशिवाय राहिला नाही! या चंद्रयानाच्या एकंदर सर्व आखून दिलेल्या कार्यक्रमात शेवटी फक्त 39 सेकंदांचा फरक पडला, यावरून अमेरिकेने या प्रवासाची सिद्धता किती बारकाईने केली होती, हे लक्षात येऊ शकते. चंद्राच्या पृष्ठभागावर पसरलेले मोठमोठे शिलाखंड आणि ज्वालामुखी यांच्यामुळे अंतराळयान तेथे उतरविण्यास सोयिस्कर जागा न सापडल्याने, ऐनवेळी हा 39 सेकंदांचा विलंब झाला हे लक्षात घेतले, म्हणजे तर या प्रवासातील संचालनयंत्रणा किती चोख होती आणि चंद्रवीर व पृथ्वीवरील नियंत्रण केंद्र यांच्यातील संपर्क किती व्यवस्थित होता, याची जाणीव होऊन कोणीही स्तिमित होऊन जाईल.
 
गेल्या 2500 वर्षांत जे ज्ञान मिळू शकले, त्याचा योग्य उपयोग करून विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत मानवाने जी प्रगती केली, त्यामुळे चंद्रलोकाचा मागोवा घेणे शक्य होऊ शकले. अमेरिकेच्या अवकाश-क्षेत्रातील नियोजकांचा आणि संशोधकांचा वाटा यात अर्थातच फार मोठा आहे. त्यांच्या अथक आणि अचाट प्रयत्नांमुळेच चंद्रलोकावर मानवाने उतरण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप लाभलेले आहे. पाचशे वर्षांपूर्वी कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर त्या देशाने जी अतुलनीय प्रगती केली, प्रत्यक्ष चंद्रलोकाला धडक देण्याचा जो धडाडीचा आणि गुंतागुंतीचा प्रवास घडविला तो खरोखरी एकमेवाद्वितीय म्हणूनच मानवी इतिहासात नमूद होणारा आहे. असा प्रवास युगायुगातून क्वचित घडत असतो व त्याचा फायदा युगानुयुगे मानवसमाजाला होत राहतो. म्हणूनच आज सार्‍या मानवजातीने अमेरिकेचे मन:पूर्वक अभिनंदन करावयाचे आहे.
 
धरतीमातेच्या गुरुत्वाकर्षणाच्या मिठीतून बाहेर पडणे ही अत्यंत अवघड गोष्ट असते. सर आयझॅक न्यूटनपासून आजपर्यंत प्रत्येकाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीपुढे मान तुकविली आहे, पण अपार काळोखातून आणि सूर्याच्या प्रखर तपातूनही अपोलो-11 ने बुधवारी एकदा सुसाट वेगाने झेप घेतली, तिने चपळाईने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून या यानाची सुटका केली व चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत ते भ्रमण करू लागले. चंद्राभोवती रुंजी घातल्यानंतर मूळ अवकाशयानातून चंद्रयान अलग झाले व चंद्राच्या दिशेने झेपावत, उड्‌डाणानंतर अवघ्या 102 तासांत ते चंद्रभूमीवर जाऊन दाखल झाले. 102 तासांत भूलोक ते चंद्रलोक असा अडीच लाख मैलांचा प्रवास करून मानवाने फार मोठा विजय प्राप्त केला. त्यानंतर अवघ्या सहा तासांनी मानवाचे पहिले पाऊल चंद्रभूमीवर पडले. हजारो वर्षांच्या मानवी इतिहासातील एक परमोच्च स्वप्न साकार झाले. जगातील क्षुद्र भेद, स्वार्थ आणि स्पर्धा यांना छेद देणारी ही महान घटना आहे.
 
या घटनेमुळे कौतुक तरी कोणाकोणाचे करावे? अनंतात बेदरकारपणाने उडी घेऊन लक्ष्य गाठणार्‍या धाडसी अंतराळवीरांचे, की त्यांच्या मागे जे हजारो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कारागीर होते त्यांचे? त्या सर्वांचे कौतुक करणे क्रमप्राप्त आहे. आपल्याकडे उग्र आणि प्रदीर्घ तपश्चर्या करणार्‍या सत्पुरुषांच्या कथा रूढ आहेत. पण, चंद्रप्राप्तीसाठी अवकाशवीरांनी जी तपश्चर्या केली, देशाच्या इभ्रतीसाठी स्वत:चे प्राणही धोक्यात घालण्याची जी तयारी ठेवली, ती पंचग्निसाधनेइतकीच खडतर होती. या अवकाशवीरांनी अरुंद बोगद्यात बसून झंझावाती वार्‍यांना तोंड देण्याचे शिक्षण घेतले, शून्य गुरुत्वाकर्षणाची सवय केली, गुरुत्वाकर्षणातील बदल व वाहनांचा प्रचंड वेग यांना तोंड देण्याची पात्रता निर्माण व्हावी म्हणून अनेक परीक्षा दिल्या. चक्राच्या टोकाला बसवून त्यांना प्रचंड वेगाने फिरविण्यात आले व ते चक्र एकदम थांबल्याने बसणारा धक्का ते कसा सहन करू शकतात याचीही चाचणी झाली. सर्व जीवघेण्या कसोट्या त्यांनी पार केल्या. सर्व अग्निदिव्यातून तावूनसुलाखून ते बाहेर पडले आणि जन्ममृत्यूच्या सीमारेषेवर वावरण्यासाठी जणू त्यांनी चंद्राकडे झेप घेतली.
 
हा साराच प्रवास रोमहर्षक; सारीच घटना चित्तथरारक आहे. पण, या अपूर्व साहसामागे कोट्यवधी मानवांच्या सदिच्छा आहेत. अनेक पिढ्यांच्या विज्ञान संशोधनाच्या आणि सदिच्छांच्या बळावर या अंतराळवीरांनी फार मोठे कार्य केलेले आहे. धरित्रीचे पुत्र चंद्राला भेटलेले आहेत. या महान घटनेपासून, परस्परांबद्दल संशय आणि भीतीने ग्रासलेल्या व त्रस्त झालेल्या मानवाला दिलासा मिळू शकेल, राष्ट्राराष्ट्रांत सहकार्याचे युग निर्माण होईल आणि चंद्रलोकावरील या सुखद-शीतल विजयापासून सर्व जग स्नेहरज्जूंत बांधले जाईल, अशी अपेक्षा करावयाला काय हरकत आहे? ही अपेक्षा व्यक्त करतेवेळीच, चंद्रलोकावर उतरलेल्या या अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुखद व्हावा, अशी सदिच्छाही आपण व्यक्त करू या...
 
 
••