दिसला ग बाई दिसला...

    दिनांक :21-Jul-2019
 
मला बघून गालात हसला ग बाई हसला।ऽ
भावगीते, लावणी, भक्तीगीत असो... आपण गातोच ना! आता ते सुरातच असलं पाहिजे असा आग्रह नको, मग आपण शेर असतो. आता शेर वरून आठवलं. पावसाळा सुरू होणार असला की मग जंगल सफारी बंद होते. यंदाही बंद करण्यात आली. मात्र, पाऊस काही आला नाही अन्‌ म्हणून आता विनापाण्याचे गावकरी काय करत असतील या विचारानं या जंगलाचा राजा गावाकडे दिवसातून एकदा चक्कर मारून येणेही बंद झाले नाही. आता जंगल परिसरातील गावे म्हणजे जंगलांचाच भाग असतो अन्‌ मग राजा म्हणून वाघोबावरच त्याची जबाबदारी असते. त्यासाठी मग तो गावाकडे एक चक्कर मारतो. वाघोबाची चक्कर झाली की मग गावकर्‍यांना चक्कर येते तो दिसला की. वाघाच्या तोंडाला पाणी लागावे म्हणून तो गावाकडे येतो अन्‌ त्याला पाहिले की गावकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळते... आता ऐन पावसाळ्यातही वाघ दिसला, कोकरू पळविलं अन्‌ लेकरू नेलं उचलून अशा बातम्या येत आहेत. काही गावात शेतात कामाला जाण्याचीही गावकर्‍यांना वाघोबामुळे भीती वाटते...
 
आता गावकडचा एक जण भेटला अन्‌ तो सांगत होता, ‘‘आता तुम्हीच सांगाना साहेब, का गावाकडं गेल्यावर वाघ पहाले ज्यंगलात जाचं काही कारन हाय का? अरे वाघ पाहाले लोक खर्च करून येतेत न लंग लंग हिंडल्यावर वाघ नाही दिसत अन्‌ गावाकडं आलो का शेजारच्या गावात वाघ चक्कर मारून गेल्याचं सांगतेत लोक...’’ आता आले ना लक्षात की ‘दिसला ग बाई दिसला...’ ही लावणी सुरुवातीला का म्हटली ते? ‘माझ्या राजाचा न्यारा डौल, डाव्या डोळ्यानं देतोय कौल’, अशाही ओळी या लावणीत आहेत. या ओळी वाघोबाला लागू होतात. एखाद्या गोष्टीच्या अव्यक्ताच्या अवकाशात असलेला नाजूक अनुबंध एखाद्याला पकडता येतो आणि त्यातही काहींनाच तो शब्दांत नेमकेपणाने मांडता येत असतो... आता तुम्हाला वाटायचं की एकदम वाङ्‌मयीन व्यामिश्र समीक्षाच सुरू केली राव तुम्ही, पण तसे नाही...
 
 
आता हे जे काय मांडले जाते ते त्यांच्या त्यांच्या अनुभवातून मांडले गेले असते. उपमा, उप्रेक्षा, अलंकारदेखील तुमच्या अनुभव आणि पर्यावरणातून, जगण्याच्या परिघातूनच येत असतात. आता एका पोलिस शिपायाला कविताच करायची होती. पोलिस असूनही कविता करायची होती. त्याने एका ख्यातनाम कविला गाठले अन्‌ त्यांना गळच घातली की, मला कविता लिहायला शिकवा. कविता अशी शिकविता येत नाही ना लिहायला. ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत कविता लिहायला काही शिकलेले नव्हते. तरीही या शिपायाची इच्छा होती की कविवर्यांनी त्याला कविता लिहायला शिकवावीच. एकतर पोलिस अन्‌ त्यातही कवितेसाठी पेटलेला. मग कविवर्यांनी पोलिस कल्याण निधीचा कार्यक्रम म्हणून कविता लेखन शिकवायचे ठरविले. त्याला सांगितले, संध्याकाळवर कविता लिही. तो म्हणाला त्यात काय लिहू... सूर्य अस्ताला निघाला आहे. आकाश लाल झाले आहे, वगैरे. त्याने कविता लिहून आणली
पोलिस ठाण्याच्या घंट्यासारखा पिवळा पिवळा सूर्य
एसपीच्या चेहर्‍यासारखा लालीलाल झाला...
देवा देवा सांजेचा हा चमत्कार झाला!
 
सांगायचा अर्थ हाच की कुठल्याही कवितेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन अन्‌ होणारा अर्थबोध हा ज्याच्या त्याच्या अनुभवातून येत असतो. ‘आता घालीन लोटांगण, वंदिन चरण’, या ओळींचा अर्थ आमच्या एका मित्राने, हे बायकोला म्हटलेले आहे, असाच सांगितला. कारण नंतरच्या ओळीत, ‘प्रेमे आिंलगीन’ असेही येते यात... तर सांगायचे हेच की जो तो त्याच्या त्याच्या आकलनातून अर्थ शोधत असतो. म्हणून दिसला ग बाई दिसला हो ओळींचा अर्थ सखा दिसला असा आजतागायत घेण्यात येत होता. आता रानात कामाला गेलेल्या बाईला अचानक ‘टी- अमुक-टमुक’ असा वाघ किंवा वाघीण दिसते अन्‌ ती बाई मग जिवाच्या आकांताने, ‘दिसला ग बाई दिसला...’ असे ओरडते. तेव्हा वाघ पाहण्यासाठी आलेले पर्यटक तिच्याकडे आश्चर्याने बघतात. कारण तेही गेले दोन दिवस त्याला पाहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्यांनी चार सफारींसाठी किमान विसेक हजार रुपये खर्च करून टाकले होते. तरीही त्यांना वाघ दिसत नाही.
 
आता वाघाच्या पक्षाचे तिकिट निवडणुकीसाठी मिळू शकते; पण पैसे खर्चून खरोखरचा वाघ काही दिसत नाही. पर्यटक मात्र वाघ दिसला की सफारीच्या गाडीतून दूरूनच त्याच्यासोबत सेल्फी काढून घेतात. आजकाल ताडोबा, कर्‍हांडल्यात सेलिब्रेटीही येतात. आताच ब्रायन लारा येऊन गेला. त्याला इकडे जा वाघ बघायला, असे अनिल कुंबळेने सांगितले होते. सचिनही कर्‍हांडल्यात मागे वाघ बघायला आला होता अन्‌ सचिन चक्क जंगलात आलाय म्हणून क्रिकेटच्या या वाघाला बघायला जंगलातला वाघही बाहेर आला होता. आजकाल जंगलातल्या वाघांनाही सेल्फीची वगैरे सवय झालेली आहे. त्यामुळे तेही पाऊट वगैरे करून पोझ देतात. वाघांना डोळे मिचकावण्याची सवय तर असतेच. त्यामुळे, ‘डाव्या डोळ्यानं देतोय्‌ कौलऽऽ’, ही ओळही सार्थक होतेच. वाघ म्हणजेही एक लावणीच आहे. म्हणजे एकदा पाहिला की पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो, म्हणजे लावण झालीच. त्यात तो असा अचानक दिसला की मग, ‘वाजले की बारा’, अशी अवस्था होतेच. पिंजर्‍याशीही त्याचा संबंध आहेच. त्यामुळे वाघ, लावणी आणि पिंजरा हे जुळतात.
 
लोकांनी पिंजर्‍यातच वाघ पाहिला असतो. नाग गारुड्याकडेच पाहिला असतो... अनेकांनी अमेरिका, स्वित्झर्लंड हे देश सिनेम्यातच पाहिलेले असतात. वाघ चित्रपटांतही दिसतो. काही चित्रपटांत नायक हा वाघाशी झुंज देत त्याला पुन्हा पिंजर्‍यात टाकतानाची दृश्ये असतात. ते पाहून मग नायिका त्याच्या प्रेमात वगैरे पडत असते. तरीही आजकाल वाघाची क्रेझ वाढली आहे. त्यात आपले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे विदर्भ हा वाघांचा प्रदेश झाला आहे. नव्या जगाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्याचा टीआरपी वाढला आहे.
 
वाघ परमेश्वरासारखा आहे. तो असतो; पण सार्‍यांनाच दिसत नाही. सोबत असलेला गाईड, जंगल म्हणजे केवळ काही वाघच नाही, हे सांगत असतो. म्हणजे तो तुमची मानसिकता तयार करतो, वाघ नाही दिसला तरी आम्ही ‘वाईल्ड थ्रोटेड विझार्ड’ नावाचा एक अनोखा पक्षी कसा पाहिला, यावर समाधान कसे मानायचे. गाईड मध्येच गाडी थांबवून एकदम सस्पेन्स चेहरा करतो अन्‌ चाहुल घेतो, कुणी नॉर्मल आवाजातही बोलले तर त्याच्या पेक्षा मोठ्या आवाजात सांगतो, बोलू नका मोठ्याने... बाजूच्या झाडीत वाघ आहे... असे म्हणत तो पग मार्क्स (हे शब्दच मोठे रोमांचक वाटतात) दाखवितो. कुण्यातरी प्राण्याची विष्ठा दाखवून, टायगर्स शीट म्हणून सांगतो. ज्याला पाहिल्यावर जी आपल्याला होते किंवा लागते ती त्याने अशी केलेली पाहूनही आपण धन्य धन्य होतो. आपल्या सफारीची वेळ झालेली असते अन्‌ मग वाघनिष्ठांना वाघ नाही पण त्याची विष्ठाच पाहिली, यावरच समाधान मानावे लागते. काही लोक इतका खर्च करून वाघ नाही दिसला, असे कसे सांगायचे म्हणून मग खोटेच सांगतात, दिसला ग बाई दिसला... मला बघून मिशांतच हसलाऽऽ़