ॲनी जंप कॅनन : तार्‍यांचं वर्गीकरण करणारी खगोलशास्त्रज्ञ!

    दिनांक :21-Jul-2019
डॉ. अच्युत देशपांडे
आकाशात असंख्य तारे असतात. या तार्‍यांचं वर्गीकरण करणं किती कठीण काम असेल, नाही? अधिक परिश्रमाशिवाय हे शक्य नाही. तार्‍यांचे गुणधर्म तपासून त्यानुसार त्यांचं वर्गीकरण करण्याची पद्धत जिने दिली, ती म्हणजे ॲनी जंप कॅनन. तार्‍यांच्या तापमानानुसार त्यांचं वर्गीकरण करण्याची पद्धत तिने शोधून काढली, ज्याला ‘हार्वर्ड क्लासिफिकेशन स्कीम म्हणून ओळखलं जातं. 

 
 
ॲनीचे वडील जहाज बनवणारे कारखानदार होते. तिला चार सावत्र भावंडं, तर दोन सख्खे भाऊ होते. तिच्या आईला रात्री आकाश निरीक्षण करायला आवडायचं आणि त्यामुळे ॲनीलाही हा छंद जडला. तिकडल्या थंड वातावरणात ॲनीला वारंवार इन्फेक्शन होऊन ती जवळजवळ पूर्णच बहिरी झाली. मॅसॅच्युसेटस्‌मधील वेलिस्ली कॉलेजमधून ती 1884 मध्ये ग्रॅज्युएट झाली, भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन, महिलांसाठी त्या काळी अतिशय कमी करीअरच्या संधी असल्यामुळे तिचे मनच उतरून गेले. त्यातच बहिरेपणामुळे लोकांमध्ये मिसळण्याला तिला मर्यादा येत. ती खूपच निराश झाली होती. ॲनीने आता फोटोग्राफीचा ध्यास घेतला आणि लवकरच त्यात प्रावीण्य मिळवले. ब्लेअर फोटोग्राफीक कंपनीने तर तिच्या फोटोंचे प्रदर्शनच भरवले. 

 
 
ॲनीची आई मरण पावल्यानंतर ॲनीचं आयुष्य आणखीनच निरस झालं. शेवटी तिने आपल्या कॉलेजमधील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र शिकवणार्‍या प्रोफेसर सारा व्हायिंटग यांना पत्र लिहून विचारले की, तिच्यासाठी काम करण्याची काही संधी मिळेल का? प्रोफेसर व्हायिंटग यांनी तिला ताबडतोब मदतनीस म्हणून नोकरी दिली. तिला भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे वर्ग घ्यावे लागत. प्रोफेसरांनी तिला भौतिकशास्त्राच्या स्पेक्ट्रोस्कोपी या शाखेत विशेष लक्ष घालायला सांगितले. ॲनी कॅनन आता हार्वर्ड वेधशाळेत डॉ. पिकरिंग यांच्यासोबत काम करू लागली. ते वर्ष होते 1896. या वेधशाळेत तार्‍यांचे फोटो काढून त्यांना 9 पट मोठे करून मग त्यांचं विश्लेषण करण्याचं काम होतं.
 
ॲनीचं फोटोग्राफीचं नैपुण्य इथे कामी आलं. तार्‍यांच्या प्रकाशाचा स्पेक्ट्रम घेऊन त्यांची योग्य नोंद घेणे आणि त्यांचं वर्गीकरण करून सूची तयार करण्याचं हे काम अतिशय कठीण होतं. ॲनीचं स्पेक्ट्रोस्कोपीचं प्रावीण्य या कामासाठी योग्यच होतं. तार्‍यांच्या स्पेक्ट्रममधील बाल्मर ॲबसॉर्पशन लाइन्सचा संबंध त्यांच्या तापमानाशी असतो. याचाच उपयोग करून तिने प्रथम स्पेक्ट्रमचे वर्गीकरण केले. त्यांना ज, इ, अ, ऋ, ऋृ, घ, च यामध्ये वर्गीकृत केले आणि त्यामुळे पुढे तार्‍यांचे वर्गीकरण करणे सुलभ झाले. ॲनीच्या सूचीमध्ये दोन लाख तीस हजार तार्‍यांचा समावेश होता आणि हे सगळं काम तिनं एकटीनं केलं. ॲनीने एक दुसरी सूची प्रकाशित केली, ज्यात तिने स्वत: शोधलेल्या 300 तार्‍यांचा समावेश होता.
 
ॲनी कॅननने जवळपास 40 वर्षे या क्षेत्रात काम केलं. या दरम्यान तिला अनेक मानसन्मान प्राप्त झाले. एप्रिल 1941 मध्ये ॲनी मरण पावली, पण आपलं कर्तृत्व अमर करून!
9404848496