कथा चंद्रविजयाची...

    दिनांक :21-Jul-2019
मा. बा. मोडक
 
शतकानुशतके पृथ्वी आणि चंद्र एकमेकांपासून लक्षावधी मैल अंतरावर अंतराळात फिरत आहेत. लोण्याच्या गोळ्यासारखा दिसणारा शुभ्र, शीतल चंद्र म्हणजे लहान मुलांचे आणि कविजनांचे फार मोठे आकर्षण! पण, हा चंद्र असा दुरूनच मुलांना आणि कवींना प्रेरणा देत राहील, आपल्या जवळपास कुणाला फिरकू देणार नाही, असेच आतापर्यंत सर्वांना वाटत होते आणि चंद्र व पृथ्वी यांच्यातील जवळजवळ दोन लक्ष मैलांच्या अंतरामुळे तर चंद्राजवळ जाणेच असंभवनीय आहे, असा सर्वसामान्य माणसांचा ग्रह झाला होता.
 
परंतु, आहे त्यात समाधान न मानता नवनवीन गोष्टींचे ज्ञान मिळविण्याची जिद्द मानवाला स्वस्थ बसू देईना. हा चंद्र आहे तरी कसा, त्यावर कुणी माणसेबिणसे आहेत की काय; नसेल तर पृथ्वीवरचा माणूस चंद्रावर जाऊन राहू शकेल का, तो तेथे गेला तर त्याला परत येता येईल की नाही... यांसारख्या अनेक प्रश्नांनी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे भंडावून सोडले होते. या प्रश्नांचे उत्तर शोधता शोधताच शेवटी 21 जुलै 1969 हा दिवस उगवला आणि पृथ्वीवरचा मानव चंद्रावर जाऊन पोहोचला!
 
अमेरिकेचे माजी अध्यक्ष कै. जॉन केनेडी यांनी 1961 मध्ये अमेरिकेचा अंतराळ संशोधनाचा कार्यक्रम सुरू केला तेव्हाच जाहीर केले होते की, येत्या 10 वर्षांत चंद्रावर मानव विजय मिळवील! त्यांची घोषणा अक्षरशः खरी ठरली. अमेरिकेने ‘स्पुटनिक’ हा उपग्रह सोडून पृथ्वीभोवती फिरवला आणि तेव्हापासून अमेरिकन शास्त्रज्ञांनी एकामागोमाग एक असे उपग्रह सोडून चंद्राभोवतीच्या वातावरणाची सर्व माहिती गोळा केली. 

 
 
चंद्रविजयाचा अखेरचा टप्पा म्हणजे अपोलो-11 चे उड्डाण! अमेरिकेतील केप केनेडी तळावरून नील आर्मस्ट्रॉंग, एडविन आल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या तीन तरुण, साहसी वीरांना घेऊन 16 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी अपोलो-11 अंतराळयानाने उड्डाण केले. या यानाचे वजन किती म्हणाल? 3100 टन! आणि उंची? 363 फूट! असे हे यान यशस्वीपणे उडाले. दर महत्त्वाच्या टप्प्याला त्याचा मागचा काही भाग गळून आवश्यक तेवढेच यान चंद्राच्या कक्षेत पोहोचले. या यानाचे नाव ठेवले होते- ‘कोलंबिया’ आणि त्याचा चालक होता मायकेल कॉलिन्स. 20 जुलैला रात्री या कोलंबिया यानातून चंद्रावर उतरणारे एक चंद्रयान बाहेर सोडण्यात आले. त्याचे नाव- ईगल. (ईगल किंवा गरुड हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी मानला जातो.) या ईगलमध्ये आर्मस्ट्रॉंग आणि आल्ड्रिन हे दोघे बसले होते. दोन्ही याने चंद्राभोवती फिरत होती व ईगल चंद्राच्या जवळ जवळ जात होते.
 
रविवार, ता. 20 जुलैला मध्यरात्रीनंतर 1 वाजून 47 मिनिटांनी ‘ईगल’ चंद्रावर अलगद उतरले. कॉलिन्स मात्र कोलंबिया यानात बसून चंद्राभोवती फिरत राहिला. नंतर काही तास आर्मस्ट्रॉंग, आल्ड्रिन यांनी झोप घेतली. सोमवार, ता. 21 ला सकाळी आर्मस्ट्रॉंगने ईगलचे दार उघडले. शिडीवरून तो खाली उतरू लागला आणि 8 वाजून 26 मिनिटांनी त्याने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. थोड्या वेळाने आल्ड्रिनही चंद्रभूमीवर उतरला आणि या दोघांनी चंद्रावरील काळसर, तपकिरी रंगाचे दगड, माती गोळा करून 20 पौंडाची पिशवी भरून घेतली. सुमारे अडीच तास दोघेही चंद्रभूमीवर हिंडले-फिरले, पण ईगलपासून दूर मात्र गेले नाहीत. चंद्रावर त्यांनी यंत्रे बसविली. आज आम्ही पृथ्वीवरील मानव शांततेच्या उद्देशाने येथे येऊन पोहोचलो, असा फलक त्यांनी चंद्रावर लावला. जे दोन रशियन अंतराळ संशोधन मोहिमेत मृत्युमुखी पडले त्यांना मिळालेली पदके चंद्रभूमीवर ठेवली आणि एवढे सारे करून ते परत ईगलमध्ये जाऊन बसले. ही सारी कामे कठीण होती, पण त्यांनी खूप तयारीही केली होती. अमेरिका व युरोपमधील कोट्यवधी लोकांनी या दोन चंद्रवीरांचा पराक्रम दूरचित्रवाणीच्या साहाय्याने पाहिला आणि ते धन्य झाले. अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन हे तर या दोघांशी खास फोनवरून बोललेही!
 
सोमवार, ता. 21 लाच रात्री चंद्रयान ईगल चंद्रभूमीवरून उडले. कोलंबिया आणि ईगल यांना एकत्र आणण्यासाठी पुढील चार तास लागले. नंतर मंगळवारी चंद्राच्या कक्षेतून अपोलो-11 यान परत पृथ्वीच्या कक्षेत आले आणि 24 तारखेला रात्री सवा अकराच्या सुमारास तिघाही अंतराळवीरांना घेऊन अपोलो-11 पृथ्वीवर सुखरूप येऊन पोहोचले.
 
मानवाने केलेल्या या अद्वितीय पराक्रमाची सर्वत्र खूप स्तुती होत आहे. आर्मस्ट्रॉंग आणि आल्ड्रिन हे अमर झाले आहेत. पण, यापुढेही शास्त्रज्ञांना मात्र स्वस्थता राहणार नाही. चंद्रावरून आणलेल्या वस्तूंची बारीक तपासणी आता होईल. त्याच्या आधारे पुढील चंद्रयात्रेत काही नवे प्रयोग होतील.
 
चंद्रानंतर मंगळ, शुक्र, गुरू...! अज्ञाताचा हा शोध कधीही संपणार नाही!
(जुलै 1969 मध्ये मुलांचे मासिकमध्ये प्रकाशित लेख)
••