जबाबदारी घेतली म्हणजे?

    दिनांक :21-Jul-2019
मंथन  
 
भाऊ तोरसेकर  
 
23 मे 2019 रोजी सतराव्या लोकसभेचे निकाल लागले आणि राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेऊन पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. पण ज्यांना त्यांनी राजीनामा दिला, त्यापैकी कुणाचीही तो राजीनामा स्वीकारण्याची हिंमत नव्हती, की त्यांच्यात तितकी कुवत नव्हती. म्हणून दोन महिने उलटून गेले तरी त्यावर पुढला काही निर्णय होऊ शकला नाही. खरेतर निवडणुकांचे मतदान संपण्यापूर्वीच राहुल गांधी रणमैदान सोडून पळालेले होते. मतदानाच्या चार फेर्‍या पूर्ण झाल्या होत्या आणि पाचवी फेरी होत असताना, राहुल गांधींनी युद्ध संपल्याची एकतर्फी घोषणा ट्विटरवर केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राहुलचे पिताजी राजीव गांधी यांच्या बोफोर्स प्रकरणाची आठवण करून दिली आणि राहुलने हत्यार ठेवलेले होते. आपल्या पित्याच्या पापकर्माचे स्मरण करून देणे, म्हणजेच मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली, असा दावा करून राहुलने शापवाणी उच्चारली होती. 5 मे रोजी ट्विटरवर राहुल म्हणतात- ‘‘युद्ध संपले आहे आणि तुमचे कर्म तुमची प्रतीक्षा करते आहे.

 
 
त्यापासून माझ्या पित्याचे स्मरणही तुम्हाला वाचवू शकणार नाही.’’ अशी ती शापवाणी होती. त्याचा अर्थ इतकाच होता की, मोदींचे दिवस भरले आहेत आणि आता त्यांना परिणामांपासून कुणीच वाचवू शकत नाही. अगदी राजीव गांधींच्या पापाचा पाढा वाचला, म्हणूनही मोदींचे पंतप्रधानपद शाबूत राहू शकत नसल्याचा निर्वाळा राहुलने दिला होता. अवघ्या 18 दिवसांनी त्यांना आपल्या कर्माचा हिशोब मिळाला आणि राजीनामा द्यावा लागला होता. पण, त्या राजीनाम्याचा अर्थ काय होता? राहुल त्यातून काय सांगू इच्छित होते? परिणामांची वा पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा देणार्‍याला जबाबदारी शब्दाचा अर्थ तरी कधी उमगला आहे काय? राहुलच्या राजीनाम्याचे कोडकौतुक करीत बसलेल्यांनातरी जबाबदारी शब्दाचा अर्थ कळला आहे काय?
पराभवाची जबाबदारी राहुलने घेतली म्हणजे काय? मागील दीड वर्षात पक्षाचे अध्यक्ष म्हणून, किंवा त्यापूर्वी साडेचार वर्षे उपाध्यक्ष म्हणून राहुल गांधीच पक्षाची सर्व धोरणे वा निर्णय ठरवत होते. त्यात पक्षाच्या इतर कुणा नेत्याला आपले मत मांडण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा अधिकारही नव्हता. एखादी भूमिका वा धोरण आवडले नाही वा पटले नाही म्हणून कुठले वाद झाले नाहीत. ज्यांचे राहुलशी पटले नाही, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे राहुल एकाकी लढत होते. कारण त्यांनीच अन्य कुणाला निर्णयात भागीदारी दिलेली नव्हती. मग एकाकी लढण्याला पर्याय कुठे होता? साहजिकच पक्षाचे जे काही नुकसान झालेले आहे, त्याला सर्वस्वी राहुलच कारणीभूत आहेत. त्यांनी तो आपला नाकर्तेपणा या राजीनामापत्रातून मान्य केला, इतकाच त्याचा अर्थ होतो. पण, त्यातून पक्षाला बाहेर काढण्याची खरीखुरी जबाबदारी मात्र राहुलने टाळलेली आहे. ज्या पराभवाचे राहुल शिल्पकार आहेत, त्याची भरपाई कुणी करायची? ती भरपाई करून देण्याला जबाबदारी घेणे म्हणतात ना? तुमच्या मुलाने वा कुणा जवळच्याने अन्य कुणाचे काही नुकसान केलेले असेल, तर त्याला वाचवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेता तेव्हा, जबाबदारी माझी, असेच शब्द वापरता ना? मग इथे शतायुषी कॉंग्रेस पक्षाला देशोधडीला लावण्याने झालेले नुकसान भरून काढायला राहुल पुढे आलेले नाहीत. त्यांच्या मातोश्री वा भगिनीनेही ती जबाबदारी उचललेली नाही. त्यांनीही हात झटकले आहेत आणि उर्वरित होयबा कॉंग्रेस नेत्यांनी आपले काय ते बघावे म्हणून पळ काढलेला आहे. त्याला मुजाहिदीन वा जैश-तोयबाप्रमाणे जबाबदारी घेणे म्हणतात. कुठेही घातपात, स्फोट वगैरे होतात, त्यानंतर अशा घातपाती संघटना जबाबदारी घेतल्याचे जाहीर करतात. त्यापेक्षा राहुल गांधींनी जबाबदारी घेण्यात कुठला फरक आहे?
 
मुंबई वा दिल्ली-काश्मिरात कुठलाही घातपात झाल्यावर आयसिस वगैरे संघटना आपणच ते हानिकारक कृत्य केल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतात. त्याला जबाबदारी घेतली, असे बातम्यांतून म्हटले जाते. वास्तवात, त्यापैकी कुणी पुढे येऊन छातीठोकपणे पुढल्या परिणामांना सामोरे जातात का? उलट, मजा केली म्हणून दूर बसून दुर्दशा झालेल्या लोकांचे हाल, गंमत म्हणून बघत असतात. त्या जनतेला संरक्षण देण्यात तोकड्या पडलेल्या सरकार-शासनाला वाकुल्या दाखवीत असतात. राहुलने घेतलेली भूमिका त्यापेक्षा कितीशी वेगळी आहे? त्यांनी कॉंग्रेसचे नुकसान भरून काढण्यासाठी काहीही करू शकत नाही, असेच एकप्रकारे जाहीर केले आहे. घातपात्यांची घोषणा जशी पापाची कबुली असते, त्यापेक्षा राहुलने पक्षाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा तसूभर वेगळा नाही. म्हणूनच तो गुन्ह्याचा कबुलीजबाब आहे. त्याला कुणी जबाबदारी घेणे म्हणत असेल, तर ती बदमाशी आहे किंवा निव्वळ मूर्खपणा आहे. थोडक्यात, राहुल गांधींनी, आपण कॉंग्रेसचे भरपूर नुकसान केले आणि त्या पक्षाला नामशेष करायचेच बाकी ठेवले, याचीच राजीनामापत्राने कबुली दिली आहे. किंबहुना घातपातानंतर जशी अराजकाची व अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण झालेली असते, तशी कॉंग्रेसची दुर्दशा करून टाकलेली आहे. मात्र, त्याची जबाबदारी घेणारा समोर असूनही कॉंग्रेसमध्ये कुणाला, त्याला पकडून जाब विचारण्याची हिंमत उरलेली नाही. ही कॉंग्रेसची किती दयनीय अवस्था आहे ना? एकूण मागील सहा वर्षांतले राजकारण व घडामोडी बघितल्या, तर नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसमुक्त भारताची नुसतीच कल्पना मांडलेली होती, पण वास्तवात राहुल गांधींनी अतिशय मनोभावे ती कल्पना साकारण्याचे कष्ट व अपरंपार मेहनत घेतलेली आहे. त्यांनी नुसती कॉंग्रेस उद्ध्वस्त करून टाकलेली नाही, तो पक्ष पुन्हा आपल्या पायावर उभा राहण्याचा विचारही करू शकत नसल्याच्या अवस्थेला आणून ठेवला आहे.
 
तसे बघायला गेल्यास लालूंचा राजद, चंद्राबाबूंचा तेलगू देसम वा मुलायमचा समाजवादी पक्षही नामशेष झाल्यासारखे आहेत. पण, त्यांनी जबाबदारी घेऊन हात झटकले नाहीत. जे काही नुकसान व विध्वंस झाला आहे, त्याचा अंदाज घेत संयम दाखवला आहे. झालेली हानी कशी भरून काढावी आणि नव्या जोमाने कसे पुन्हा उभे राहावे, त्यावर त्यांनी विचार चालविला असणार, यात शंका नाही. अगदी बंगालच्या ममता बॅनर्जी किंवा दिल्लीचे केजरीवालही आपल्या पक्षाची झालेली पडझड सावरण्यासाठी कामाला लागलेले आहेत. पण, ज्याचे सर्वाधिक नुकसान झाले, त्या कॉंग्रेस पक्षात आनंदीआनंद आहे. तिथल्या बहुतांश नेत्यांना पक्षाची फिकीर नसून राहुलच्या जागेवर कुणी खरेच हुशार समर्थ नेता आला, तर आपल्याला प्रथम डच्चू मिळेल, म्हणून िंचता लागलेली आहे. त्यापेक्षा पडझड झालेल्या वा मोडकळीस आलेल्या वाड्यातही आश्रय टिकून राहावा म्हणून त्यांच्या कसरती चालू आहेत. जसे जिहादी वा नक्षलींचे छुपे समर्थक पकडले जाऊ शकणार्‍यांना पाठीशी घालायला पुढे येतात, तशीच सध्या कॉंग्रेसच्या बहुतांश नेत्यांची राहुलना वाचवण्यासाठी खटपट चालू आहे. एकूण काय, राहुलने कॉंग्रेस उद्ध्वस्त करून टाकलेली आहे आणि ते काम एका दिवसात झालेले नाही. आधीच घराणेशाहीने पोखरून निघालेल्या कॉंग्रेसचा डोलारा राहुलने दणक्यात लाथ घालून कोसळून टाकलेला आहे. मात्र, त्या अवशेषातही अनेकांना अजून काही लाभ मिळण्याची आशा आहे. पण, ज्याने तो विध्वंस घडवून आणला, त्याला कशाचीही फिकीर नाही. तो मस्तपैकी खुलेआम मोकाट फिरतो आहे. महात्माजींनी, स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेस बरखास्त करून टाकण्याचा दिलेला सल्ला पणजोबाने फेटाळला. आज त्यांचाच पणतू त्या गांधींची इच्छा प्रत्यक्षात पूर्ण करतो आहे. राहुल गांधींचे हे कर्तृत्व इतिहासालाही नोंदवून ठेवावे लागणार आहे. पुढल्या पिढीतले इतिहासकार व विश्लेषक त्याची योग्य कारणमीमांसा करतील नक्कीच!