‘तुला पाहते रे’ ने घेतला प्रेक्षकांचा निरोप

    दिनांक :21-Jul-2019
छोट्या पडद्यावर चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळालेल्या ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेने अखेर शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. याचसोबत विक्रांत सरंजामेच्या भूमिकेतील सुबोध भावे आणि ईशाच्या भूमिकेतील गायत्री दातार हे दोघेही भावूक झालेले दिसले. मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेताना सुबोध आणि गायत्री या दोघांनीही सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात.

 
‘तुला पाहते रे’मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. सुरूवातीला साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर व सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना भुरळ पाडली. त्यानंतर या मालिकेत टर्न अँड ट्विस्ट आले. विक्रांत सरंजामे आणि ईशाचे लग्न झाले. ईशा हिच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले. शिवाय विक्रांत हाच राजनंदिनीला मारतो अशा बऱ्याच गोष्टी मालिकेत पाहायला मिळाल्या. २० जुलैला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. २२ जुलै पासून या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका भेटीला येणार आहे.