क्रेडिट कार्ड फायदेशीर

    दिनांक :22-Jul-2019
क्रेडिट कार्ड फायदेशीर
 
भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अहवालानुसार मार्च 2019 मध्ये क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये दोन कोटींची वाढ नोंदवण्यात आली. आर्थिक व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा वापर वाढत असल्याकडे हा अहवाल अंगुलीनिर्देश करत असला तरी खर्च वाढण्याच्या भीतीने अनेकजण क्रेडिट कार्डपासून लांब रहाण्याचा प्रयत्न करतात. क्रेडिट कार्ड बाळगणं चुकीचं नाही. त्याच्या शिस्तबद्ध वापराने तुम्हाला बरेच लाभ मिळू शकतात. याबाबत माहिती करून घेऊ या. 
 
  • क्रेडिट कार्डच्या व्यवहारांचं स्वरुप कर्जासारखं असल्यामुळे तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलांच्या क्रेडिट स्कोअरवरही त्याच प्रकारचा परिणाम होतो. कार्डचं बिल वेळेत भरलं नाही तर क्रेडिट स्कोअर प्रभावित होऊ शकतो. खरेदी केल्यानंतर कर्जाप्रमाणे कार्डच्या व्यवहारावर कोणतंही व्याज भरावं लागत नाही. त्यामुळे क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा करण्याचा हा अत्यंत सुलभ असा पर्याय आहे. क्रेडिट कार्डचं बिलं वेळेत भरा. क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान ठेवा. चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्ही कमी व्याजाचं कर्ज मिळवू शकता.
  • क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही बरेच लाभ मिळवू शकता. रिवॉर्ड पॉईंट्‌स, सवलती, गिफ्ट व्हाउचर्स असं बरंच काही क्रेडिट कार्डच्या खरेदीवर मिळतं. त्यामुळे तुमच्या जीवनशैलीला साजेसं क्रेडिट कार्ड घेऊन हे लाभ मिळवता येतील.
  • क्रेडिट कार्डमुळे तुम्ही व्याजमुक्त कालावधीचा लाभ मिळवू शकता. क्रेडिट कार्डद्वारे झालेला व्यवहार आणि बिलाचा देय दिनांक यामधल्या कालावधीला व्याजमुक्त कालावधी म्हणतात. या काळातल्या आर्थिक व्यवहारांवर कोणतंही व्याज आकारलं जात नाही. क्रेडिट कार्डच्या व्यवहारानुसार व्याजमुक्त कालावधी 18 ते 55 दिवसांपर्यंत असू शकतो.
  • पुरेशी आर्थिक तजवीज नसेल तर मोठी खरेदी टाळली जाते. पण क्रेडिट कार्डवर ईएमआय म्हणजे हप्त्यावर खरेदी करण्याचा पर्याय मिळतो. यावरही बर्‍याच सवलती मिळतात. क्रेडिट कार्ड असेल तर मोठी खरेदी वेळेत करता येते.
  • अचानक आर्थिक अडचण उद्भवली तर क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या बँकेकडून कर्ज घेता येतं. यासाठी कोणतीही कागदपत्रं सादर करावी लागत नाहीत.