एकत्रित विमा पॉलिसी घ्यावी का?

    दिनांक :22-Jul-2019
जीवन विमा पॉलिसीचं महत्त्व वादातीत आहे. गेल्या काही वर्षाांमध्ये जोडीने कमावणार्‍या जोडप्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे जोडीदारालाही विमा संरक्षणाची गरज असल्याचं अनेकांना प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. आपला मृत्यू झाल्यानंतर कुटंबियांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू नये, हा यामागचा उद्देश असल्याने यात काहीच वावगं नाही. त्यातच कमावता जोडीदार नसलेले अनेकजण एकत्रित जीवन विमा पॉलिसी घेण्यावर भर देत आहेत. आपल्या जोडीदारालाही विमा संरक्षण मिळावं, असा यामागचा उद्देश असतो. उत्पन्नाचा कोणताही मार्ग नसणार्‍या जोडीदाराला भविष्यात आर्थिक कारणांसाठी इतरांवर अवलंबून रहावं लागू नये, म्हणून हा निर्णय घेतला जातो. 

 
 
विमा संरक्षण घेणार्‍या दोन्ही व्यक्तींना एकत्रित जीवन विमा आर्थिक स्थैर्य देतो. एकत्रित जीवन विमा नावाप्रमाणे दोन व्यक्तींना विमा संरक्षण देतो. ही पॉलिसी प्रथम मृत्यू या संकल्पनेवर आधारित असते. म्हणजे पॉलिसी संपण्याआधी दोन विमाधारकांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसर्‍याला पॉलिसीची रक्कम दिली जाते. काही रक्कम खात्रीशीर नियमित उत्पन्न म्हणून दिली जाते. दरम्यान, बहुसंख्य पॉलिसी एका विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर संपतात. लहान मुलं असणार्‍या पालकांनी अशा प्रकारची एकत्रित विमा पॉलिसी घ्यायला हवी. या पॉलिसीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दुसर्‍या जोडीदाराला भरपूर रक्कम मिळते. यामुळे मुलं तसंच इतर कुटुंबियांशी संबंधित आर्थिक जबाबदार्‍या पार पाडताना अडचणी येत नाहीत. घरातल्या दोन कमावत्या व्यक्तींनी दोन वेगळ्या पॉलिसी घेण्याऐवजी एकत्रित जीवन विमा पॉलिसीत केलेली गुंतवणूक तुलनेने स्वस्त पडते. त्यामुळे अशा पॉलिसीचा विचार करायला हरकत नाही.