जुनोना जंगलात सांबराची शिकार

    दिनांक :22-Jul-2019
सहा आरोपींना अटक
 
चंद्रपूर,
जंगलात सांबराची शिकार करून मांस शिजवत असलेल्या सहा जणांना सोमवार 22 जुलै रोजी दुपारी वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी अटक केली.
 
 
चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील जुनोना गावालगत कक्ष क्रमांक 481 मध्ये सांबराची शिकार करण्यात आली. या शिकारीची माहिती वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेख, सहायक व्यवस्थापक आत्राम यांनी जुनोना गाव गाठून झडती सुरू केली. यात काही नावे समोर आल्यावर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा आरोपींच्या घरी सांबराचे मटण शिजवत असल्याचे आढळून आले. यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मांसासह आरोपींना अटक केली. आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(2), 1972/9, 39, 40,41,44,51,52, भादस 1960 कलम 139 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपींकडून सूरी, कुर्‍हाड व शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले. या शिकार प्रकरणात प्रदीप वेट्टी, भीमराव सिडाम, प्रकाश दुर्योधन, शिषुपाल दुर्योधन, निलेश रायपुरे, मंगेश दुर्योधन या सहा आरोपींना वनविकास महामंडळाने अटक केली आहे.