अकोल्यात अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड

    दिनांक :22-Jul-2019
 तिघांना अटक
 2 दिवसांची पोलिस कोठडी
 
अकोला,
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने न्यु भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम येथे गुप्त माहितीच्या आधारे रविवारी रात्री 10च्या सुमारास छापा टाकला. या नर्सिंगहोममध्ये अवैध गर्भपाताचा गोरख धंदा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी नर्सिंग केअर सील केले असून बोगस डॉ. रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवि भास्कर इंगळे यांना अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
न्यु भागवत प्लॉट परिसरात ऋषी होम नर्सिंग केअर हे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रुपेश तेलगोटे नामक केवळ 12 वी शिकलेल्या इसमाने हे नर्सिंग केअर सुरू केले. त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही. या बेकायदेशीर नर्सिंग केअरमध्ये राजरोसपणे मोठ्या प्रमाणात गर्भपात होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यांनी पाळत ठेऊन आणि गुप्त माहितीच्या आधारे रविवारी रात्री उशिरा या ठिकाणी बनावट पती तसेच गर्भवती महिलेला रुग्णालयात पाठविले. पतीने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकला. तपासणी केली असता पोलिसांनाही धक्का बसला. कारण नर्सिंग केअरचा संचालक रुपेश तेलगोटे हा केवळ 12 वी शिकला असून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नव्हती. त्याला अटक करून तेथे या कामात सहकार्य करणार्‍या परिचारिका वैशाली संजय गवई व गर्भपाताचे वैद्यकीय साहित्य आणून देणारा रवि भास्कर इंगळे या तिघांना रात्री 11.30 वाजता अटक करण्यात आली. या कारवाईत आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख, अ‍ॅड. शुभांगी खाडे, अंकुश गंगाखेडकर, हेमंत मेटकर यांचा सहभाग होता.