शिकारीच्या शोधात बिबट घुसला घरात

    दिनांक :22-Jul-2019
इटोलीत सहा तास बिबट्याचा थरार
फटाके फोडून बिबट्याला काढले बाहेर
 
चंद्रपूर,
बल्लारपूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या इटोली गावात शिकारीच्या शोधात बिबट्या लता गोपाळ देवतळे या महिलेच्या घरात बिबट्या घुसला. महिलेने समयसुचकता बाळगून त्वरित बाहेरून दार बंद केले. त्यानंतर तब्बल सहा तास वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबविले. फटाके फोडून बिबट्याला घराबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याचा हा थरार इटोलीवासियांनी शनिवारी रात्रभर अनुभवला. बिबट्याने धुमाकुळाने नागरिक भयभित झाले होते.
 

 
 
इटोली येथील लता गोपाळ देवतळे ही महिला शुक्रवारच्या रात्री घरात असताना अचानक बिबट आपल्या घरात शिरल्याचे लक्षात येताच, लता देवतळे प्रसंगावधान साधून त्वरित घराबाहेर पडल्या आणि बाहेरून दरवाजाची कडी लावली. त्यानंतर याबाबत शेजार्‍यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी देवतळे यांच्या घराबाहेर एकच गर्दी केली. त्यानंतर वनविभागाला सूचना देण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी संतोष थिपे, क्षेत्र साहाय्यक प्रवीण विरूटकर, वनरक्षक कवासे, पोडचलवार, रामटेके,जुमडे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सर्व नागरिकांना बाजुला सारून सुरक्षितस्थळी नेण्यात आले. त्यानंतर पोलिस व रेस्क्यू पथकाच्या सहाय्याने बिबट्याला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. बिबट घरातून बाहेर पडल्यानंतर बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळविण्याकरिता गावाच्या दिशेने जाळी लावून तो रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर बिबट घराबाहेर निघावा, यासाठी फटाके फोडून घराचे दार उघडण्यात आले. दार उघडताच बिबट्याने घराबाहेर पडून जंगलाकडे धूम ठोकली. शनिवारी रात्री 11 वाजता सुरू झालेली ही मोहीम पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास फत्ते झाली आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी परिसरात प्रकाश व्यवस्था व झाडझुडपे सफाई करून सौर कुंपन करण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकार्‍यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.