गोंदियाच्या युवकाचा हाजराफॉलमध्ये बुडून मृत्यू

    दिनांक :22-Jul-2019
सालेकसा,
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यांतर्गत येणार्‍या हाजराफॉल येथे 3 मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार, 21 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

 
हेमंत लाटे गोंदिया असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमंत वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत हाजराफॉल येथे गेला होता. आंघोळीची इच्छा झाल्याने तो पाण्यात उतरला. मात्र, खोल पाण्यात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती लगेच सालेकसा पोलिस ठाणे व पोलीस नियंत्रण कक्ष गोंदियाला देण्यात आली. युवकाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले असता पथकाने रात्र झाल्याने शोध कार्य थांबविले. सोमवार, 22 जुलै रोजी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आले असता युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजन चौबे यांनी दिली.