‘इस्रो’ची ऐतिहासिक गगनभरारी!

    दिनांक :23-Jul-2019
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात ‘इस्रो’ने तयार केलेले ‘चांद्रयान-2’ अखेर यशस्वी रीत्या चंद्राच्या दिशेने अवकाशात झेपावले आहे. संपूर्ण देशाला ज्याची प्रतीक्षा होती, ती ऐतिहासिक घटना सोमवारी दुपारी घडली आणि भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढचे पाऊल पडले. भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. त्यामुळे या मोहिमेला जागतिक ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले होते. चांद्रयान-2 मोहिमेत आधी रशिया आपल्याला सहकार्य करणार होता. पण, ऐनवेळी रशियाने माघार घेतली आणि भारताने कच न खाता ही मोहीम स्वबळावर यशस्वी केली. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान वापरून चांद्रयान अवकाशात झेपावल्याने भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्र किती प्रगत आणि विकसित झाले आहे, भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक किती प्रगल्भ, संयमी आणि हुशार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. 2008 साली चांद्रयान-1 भारताने पाठविले होते. आता पुन्हा एकदा चांद्रयान पाठविण्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना भरघोस यश मिळाले, यासाठी चांद्रयान-2 मोहिमेत सहभागी असलेल्या ‘इस्रो’च्या तमाम वैज्ञानिकांचे आणि संशोधकांचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे. चांद्रयान-2 अवकाशात पाठवून ‘इस्रो’ने अंतराळ संशोधनात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चांद्रयान अवकाशात पाठविणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे आणि याचे सगळे श्रेय हे आमच्या हुशार शास्त्रज्ञांना व वैज्ञानिकांना जाते. आपल्या अभ्यासाच्या, संशोधनाच्या, परिश्रमाच्या, समर्पणाच्या आणि देशनिष्ठेच्या भरवशावर अतिशय कमी खर्चात चांद्रयान तयार करून ते चंद्राच्या दिशेने पाठविण्याचा महाचमत्कार आमच्या शास्त्रज्ञांनी केला आहे, याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. देशाची मान उंचावण्याचे आणि जगात भारताची प्रतिष्ठा वाढविण्याचे अतिशय कठीण व मोठे काम या वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी केले, याबद्दल देशवासीयांच्या वतीने या सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.
 
 
संपूर्ण भारतीय बनावटीचं चांद्रयान-2 हे सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेनं अवकाशात झेपावलं आणि एक इतिहास घडला. 2008 साली भारतानं चांद्रयान-1 पाठवलं होतं. आता दुसरं यान पाठवलं आहे. तब्बल 11 वर्षांनी अंतराळात पुन्हा एकदा तिरंगा डौलानं फडकणार आहे. आता यान तर यशस्वी रीत्या झेपावलं आहे आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे! हीसुद्धा आमच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब असेल. कारण, चंद्राच्या या भागावर उतरण्याचं धाडस अद्याप कुठल्याही देशानं केलेलं नाही. असं धाडस भारतीय वैज्ञानिकांनी दाखवलं, ही फार मोठी गोष्ट आहे. असे धाडसी वैज्ञानिक आपल्या देशात आहेत, ही तमाम भारतीयांसाठी आनंदाची बाब होय. जोपर्यंत आपण धाडस दाखवत नाही, तोपर्यंत कुठल्याही क्षेत्रात प्रगती करणे केवळ अशक्य असते. त्यामुळे भारतीय वैज्ञानिकांच्या धाडसाने जगात भारताची पत वाढणार आहे, अंतराळ संशोधन क्षेत्रातील योगदानामुळे आणि मिळणार असलेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे देश झपाट्याने प्रगतीची यशोशिखरं गाठेल, यात शंका नाही. अमेरिका, रशिया, आणि चीन या तीन देशांनीही चांद्रयान मोहिमा यशस्वी केल्या आहेत. अमेरिकेने तर सर्वप्रथम 1969 साली 20 जुलै रोजी आपले यान चंद्रावर उतरवले होते आणि त्यांचा पहिला अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग हा 21 जुलैच्या पहाटे चंद्रावर प्रत्यक्ष उतरला होता. त्या घटनेला कालपरवाच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत आणि योगायोग बघा, काल भारतानेही आपले चांद्रयान-2 यशस्वी रीत्या चंद्राच्या दिशेने पाठविले आहे.
 
भारताने पाठविलेलं हे चांद्रयान-2 तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर सुमारे 55 दिवसांनंतर प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहे. हा प्रवास आपल्याला वाटतो तितका सोपा निश्चितच नाही. पृथ्वीपासून 181.6 किमीचा प्रवास झाल्यानंतर चांद्रयान प्रक्षेपकापासून वेगळं झालं, हीसुद्धा वैज्ञानिकांनी ठरविल्याप्रमाणे घडलेली घटना आहे आणि यानंतर पुढले 23 दिवस हे यान आता पृथ्वीच्या कक्षेत राहील. 30 ते 42 दिवसांत हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, 48 व्या दिवशी विक्रम हे लॅण्डर आणि प्रग्यान हे रोव्हर चंद्रावर उतरेल. 7 सप्टेंबर रोजी चांद्रयानाचे चंद्रावर सॉफ्ट लॅर्ंिण्डग होईल आणि भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल, ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गौरवाची बाब असेल. याचे सगळे श्रेय हे आपल्या वैज्ञानिकांचे आहे. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे देशाला भविष्यात जे फायदे होणार आहेत, ते अनमोल असतील. आपले अंतराळयान चंद्राच्या दिशेने झेपावले असले, तरी ते प्रत्यक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डिंग करेपर्यंत अनेक अडचणी आणि आव्हानं आहेत. त्या आव्हानांचा मुकाबला करण्यात आपले वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ सक्षम आहेत, यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयानाच्या गतीवर नियंत्रण ठेवणे, चांद्रयान-2 हे पृथ्वीपासून तीन लाखांपेक्षा अधिक किलोमीटर दूर असल्याने त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे, यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर लॅण्डर आणि रोव्हर प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविणे, ही सगळी मोठी आव्हानं आहेत. पण, इतर देशांच्या तुलनेत भारतीय शास्त्रज्ञांनी अतिशय कमी खर्चात या यानाची निर्मिती केली, ते यशस्वी रीत्या अंतराळात पाठविले, ते बघता कुठल्याही आव्हानाचा मुकाबला करण्यात अपयश येईल, याची तिळमात्र शक्यता नाही. खरेतर चांद्रयान-2 हे 15 जुलै रोजीच अवकाशात झेपावणार होतं. पण, ऐनवेळी त्यात काही बिघाड असल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले आणि कुठलीही घाई न करता प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय ‘इस्रो’ने घेतला. तो योग्यच होता. घाई झाली असती तर कदाचित भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राला मोठा धक्का बसला असता, वैज्ञानिकांच्या मनोबलावर त्याचा परिणाम झाला असता, मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. पण, ‘इस्रो’च्या हुशार अन्‌ संयमी वैज्ञानिकांनी घाई केली नाही आणि लक्षात आलेला बिघाड अल्पावधीत दुरुस्त करून चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने यशस्वी रीत्या पाठवत आपली क्षमताही पुन्हा एकदा सिद्ध केली.
 
यासाठीही वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे कमी होईल. चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तिथल्या अनेक रहस्यांचा उलगडा आपल्याला होणार आहे. चंद्रावर पाणी आहे का, असेल तर पाण्याची पातळी किती आहे, चंद्रावरील जमीन कशी आहे, तिथे कोणकोणती खनिजं आहेत, या सगळ्या बाबींचा उलगडा आपल्याला होईल आणि पुढली दिशा ठरविताना त्याचा उपयोग होईल, हे निश्चित! बाहुबली रॉकेटच्या मदतीनं अवकाशात झेपावलेलं चांद्रयान-2 तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचावेल, असंच आहे. हे यान पाठविण्यासाठी ‘इस्रो’च्या चमूनं अथक परिश्रम घेतले, त्या चमूला सलाम केला पाहिजे. ‘इस्रो’च्या या ऐतिहासिक कामगिरीने आज संपूर्ण देश आनंदित झाला आहे. सव्वाशे कोटी देशवासीयांना आपल्या अंतराळ संशोधन संस्थेने केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे!