मोहम्मद हामिद अन्सारींभोवती संशयकल्लोळ!

    दिनांक :23-Jul-2019
तिसरा डोळा  
 चारुदत्त कहू 
 
 
मोहम्मद हामिद अन्सारी हे नाव उच्चारताच एक उच्चविद्याविभूषित, पांढरी फ्रेंचकट दाढी असलेली, एका सडसडीत व्यक्तीची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. दोन वेळा देशाचे उपराष्ट्रपती राहिलेल्या या व्यक्तीने, भारतीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्षपदही भूषविलेले आहे. भारतीय विदेश सेवेत असताना त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले असून अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिरात व इराण या देशांत त्यांनी भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारीचे वहन केले आहे. 1984 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
2000 ते 2004 पर्यंत त्यांनी अलिगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले. गुजरात दंगलींमध्ये पीडित मुस्लिम कुटुंबांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी वठविलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. अल्पसंख्यक आयोगाचे काम करीत असताना त्यांनी शीख, पारशी आणि ख्रिस्ती लोकांनाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पारंपरिक धार्मिक शिक्षणाऐवजी आधुनिक शिक्षणावर त्यांचा नेहमीच भर राहिला. आधुनिकीकरण आणि उदारवादाचे समर्थक म्हणून ते ओळखले जातात.
 
 
 
देशाचे बारावे उपराष्ट्रपती असलेल्या मोहम्मद हामिद अन्सारी यांनी बजावलेल्या कामगिरीची माध्यमांनी बरीच चर्चा केली. तथापि, त्यांनी वारंवार घेतलेला मुस्लिमांचा कैवार माध्यमांच्या दृष्टीस पडला नाही. उपराष्ट्रपतिपदाच्या निरोपसमारंभात त्यांनी वाद ओढवून घेतला. कार्यक्रमाला उपस्थित लोकप्रतिनिधींपुढे बोलताना त्यांनी, भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत, असा सूर लावून या देशाच्या लोकशाही परंपरेबद्दल आणि राज्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलच शंका उपस्थित करून वाद ओढवून घेतला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत भारतात गणतंत्र दिवस साजरा केला गेला. त्या वेळी भारतीय राष्ट्रध्वजाला सलामी न दिल्याबद्दलचे त्यांचे छायाचित्र बरेच व्हायरल झाले होते. समाजमाध्यमांमध्ये त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. अखेर सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला, उपराष्ट्रपती सावधानच्या मुद्रेत होते व राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता, असा खुलासा करावा लागला होता.
खिलाफत आंदोलनाला असलेले अन्सारींचे समर्थन, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेले त्यांचे नातेवाईक (40 हून अधिक गुन्हे असलेले मुख्तार अन्सारी), राजपथावर योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, यावरूनही अन्सारींवर टीका-टिप्पणी झालेली आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्याने आता अन्सारींविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींवर सरकारने कारवाई करावी, अशी रॉच्या माजी अधिकार्‍यांची अपेक्षा आहे. तक्रारकर्त्या रॉच्या माजी अधिकार्‍यांच्या मते, तेहरानमध्ये असताना अन्सारींनी भारताच्या हितरक्षणाकडे तर दुर्लक्ष केलेच शिवाय तेहरानच्या (डअतअघ) सावक या गुप्तचर संस्थेशी संधान साधून रॉच्या मोहिमांनाच सुरुंग लावला. अन्सारी इराणमध्ये राजदूत असतानाच्या काळात दूतावासाचे कर्मचारी, अधिकारी आणि मुत्सद्यांच्या अपहरणाच्या चार घटना घडल्या. या सर्व घटनांमध्ये ‘सावक’ या गुप्तचर संघटनेचा हात स्पष्टपणे दिसत असताना अन्सारींनी त्याबाबत चकार शब्द काढला नाही, ना त्याबाबत भारतीय विदेश विभागाला कल्पना दिली. अधिकार्‍यांचा तर, अन्सारी भारताचे हितरक्षण करण्यास आणि आपले कर्तव्य पार पाडण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप आहे.
 
एन. के. सूद नावाच्या रॉच्या एका अधिकार्‍याने, त्याच्या निवृत्तीनंतर 2010 मध्ये माध्यमांशी सपर्क साधून, अन्सारींनी इराणमधील ‘रिसर्च ॲण्ड ॲनालिसिस विंगचा गाशा गुंडाळण्याचा सल्ला भारत सरकारला दिल्याचा आरोप केला होता. 1979 मध्ये ‘सावक’ या गुप्तचर संस्थेचे विभाजन झाले. त्याऐवजी ‘साझमन ए इत्तेलात वा ॲमनिएट-ई मेली-ई इराण’ ही नवी संस्था अस्तित्वात आली. तथापि, ही संस्था योग्य रीत्या सर्वपरिचित नसल्याने आजतागायत रॉसुद्धा इराणच्या गुप्तचर संस्थेला जुन्या म्हणजे ‘सावक’ याच नावाने ओळखते आणि हाच संदर्भ घेऊन सारा पत्रव्यवहारदेखील केला जातो. सूद यांनी माध्यमांशी बोलताना, अन्सारींकडून कुठल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, याची उदाहरणे मांडली आहेत.
 
1991 मध्ये, संदीप कपूर या भारतीय अधिकार्‍याचे तेहरान विमानतळावरून उघडउघड अपहरण करण्यात आले होते. हा मुद्दा अन्सारींच्या निदर्शनास आणून दिला असता, त्यांनी कपूर यांचा शोध घेण्यासाठी कुठलीही पावले उचलली नाहीत. उलट, गोपनीय अहवाल पाठवून संदीप कपूर यांच्या कार्यकलापांवर इराणच्या गुप्तचर संस्थेला संशय होता, असे ठासून सांगितले. कपूर यांचे स्थानिक महिलांशी संबंध असल्याचा खोटानाटा अहवालदेखील त्यांनी पाठवल्याचे सूद यांचे म्हणणे आहे. या अपहरणात ‘सावक’ या गुप्तचर संस्थेचा सहभाग असल्याचे रॉच्या अधिकार्‍यांनी ध्यानात आणून दिले होते, पण त्याचा उल्लेखही अन्सारींनी त्यांच्या गोपनीय अहवालात हेतुपुरस्सर टाळला.
या घटनेच्या तीन दिवसांनंतर, भारतीय दूतावासात एका अनामिक व्यक्तीने फोन केला आणि फोन घेणार्‍या व्यक्तीला, संदीप कपूर रस्त्याच्या एका कडेला बेशुद्धावस्थेत पडले असल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास केला असता, त्यांच्यावर औषधांचा मारा करण्यात आल्याचे ध्यानात आले. या औषधांचा अनेक वर्षे त्यांच्यावर प्रभाव राहिला. याबाबत इराण सरकारकडे तक्रार दाखल करून निषेधपत्रही द्यावे, ही रॉच्या अधिकार्‍यांची सूचना अन्सारींनी फेटाळून लावली आणि एका प्रामाणिक अधिकार्‍यावर सुरू असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष केले.
 
ऑगस्ट 1991 मध्ये इराणच्या कौम येथील धार्मिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या काश्मिरी युवकांवर रॉची करडी नजर होती. अनेक काश्मिरी युवक येथे नेमाने शस्त्र प्रशिक्षणासाठी येत. त्या वेळी रॉच्या केंद्रात नियुक्त झालेल्या नव्या केंद्रप्रमुखाला याची कल्पना देण्यात आली व ही बाब चुकूनही तेव्हाचे राजदूत मोहम्मद हामिद अन्सारींच्या कानावर न घालण्याचा सल्ला जुन्याजाणत्या कर्मचार्‍यांनी दिला. तथापि, नव्या प्रमुखाने या सूचनेकडे दुर्लक्ष करून ही बाब अन्सारींच्या कानावर घातलीच. ही मोहीम डी. बी. माथुर नावाचे अधिकारी जबाबदारीने राबवत होते. त्यांचे नाव अन्सारींनी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळविले. ही माहिती लागलीच ‘सावक’ या गुप्तचर संस्थेकडे पाठविली गेली. दुसर्‍या दिवशी सकाळी दूतावासात जात असताना माथुर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना उचलण्याची कारवाई ‘सावक’ने केली होती, हेदेखील संध्याकाळपर्यंत स्पष्ट झाल्याची माहिती सूद यांनी माध्यमांना पुरविली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रॉच्या माजी अधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारीत या घटनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अन्सारींनी या प्रकरणात कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत. केवळ माथुर बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी इराणच्या विदेश मंत्रालयाच्या कार्यालयाकडे नोंदविली. तसेच याची माहिती दिल्लीला दिली, पण त्यात इराणी गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा साधा उल्लेखही केला नाही. दुसर्‍या दिवशी रॉच्या अधिकार्‍यांनी कशीबशी ही माहिती दिल्लीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कानावर घालण्यात यश मिळविले. त्यांनी ही बाब तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरिंसह राव यांच्या कानावर घातली. त्यांच्या मध्यस्थीनंतर सहा दिवसांनी माथुर यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. पण, या सुटकेनंतर त्यांना 72 तासांत देश सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले. या सार्‍या प्रकरणात अन्सारींची भूमिका संशयास्पदच राहिली. रॉच्या अधिकार्‍यांना भारतीय राजदूतांची मदत मिळणे तर दूर, उलट त्यांच्याबाबतची माहिती इराणला पुरवून अन्सारींनी देशद्रोहच केला आहे, असा कयास कुणी लावला तर वावगे ठरू नये! भारतीय राजदूताच्या निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या मोहम्मद उमर यालाही एकदा ‘सावक’ने ताब्यात घेतले आणि तीन तासांत त्याची सुटका केली. या प्रकरणाकडेही अन्सारींनी डोळेझाकच केली. ते निरपराध असल्याचे रॉने अनेकवार सांगूनही अन्सारींनी त्याला भारतात परत पाठवण्याचा आग्रह धरला आणि त्याला यापुढे विदेश सेवेतून बाद ठरवण्याची शिफारस केली.
 
पी. के. वेणुगोपाल या रॉच्या अधिकार्‍यावर झालेल्या अन्यायाचे प्रकरणही असेच गुंतागुंतीचे होते. त्या प्रकरणातही अन्सारींनी रस दाखवला नाही. पाकिस्तानच्या, तेहरानमधील राजदूतासोबत अन्सारींच्या होणार्‍या नित्य आणि वारंवार भेटींबाबतही भारताला अंधारात ठेवण्यात आले. रॉविरुद्ध त्यांची इतकी नाराजी होती की त्यांनी दुबई, बहरीन, सौदी अरेबिया येथील भारतीय राजदूतांना हाताशी धरून रॉवर शरसंधान केले. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराची, देशविरोधी कारवायांची अनेक प्रकरणे उघडकीस आली. रॉच्या माजी अधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा करून निर्माण झालेला संशयकल्लोळ दूर व्हावा, ही अपेक्षा!
9922946774