वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी लाच घेताना लिपीकाला अटक

    दिनांक :24-Jul-2019
 
भंडारा,
सेवानिवत्ती नंतर घ्यावयाच्या लाभाचे बील तपासून वरिष्ठांकडे मंजूरीसाठी पाठविण्यासाठी लाचेची मागणी करणा-या जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपीक प्रकाश पटले याला आज 5 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. भंडारा पोलिस ठाण्यात पटले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.
 
 
 
तक्रारकर्ती व्यक्ती ही सेवानिवृत्त अधिकारी असून आश्वासित प्रगती योजनेच्या पहिल्या हप्ताचा लाभ, वरिष्ठ श्रेणी लागू झाली असल्याने त्याची थकबाकी व 6 व्या वेतन आयोगाचे पाच हप्ते असे एकूण 11 लाख 63 हजार 409 रुपयाचे बील जिल्हा कोषागार कार्यालयाकडे प्रलंबित होते. प्रलंबित बिलासंदर्भात तक्रारकर्ती व्यक्ती विचारपूस करण्यासाठी गेली असता, बील तपासून वरिष्ठांकडे मंजूरीसाठी पाठविण्यासाठी 5 हजार रुपये लागतील, असे कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपीक प्रकाश पटले यांनी सांगितले.
 
इच्छा नसल्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. दोनदा पडताळणी केल्यानंतर पटले यांनी 5 हजार रुपयाची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज 24 रोजी सापळा रचण्यात आला. पटले यांना 5 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरिक्षक योगेश पारधी करीत आहेत.